अॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्ध अॅडलेडच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटीत सामन्यात वॉर्नरने दमदार त्रिशतक झळकावले. पाकिस्तानच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत वॉर्नरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि त्रिशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियासाठी धावांचा डोंगर उभा करुन दिला.
धडाकेबाज खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच त्रिशतक ठरले. यासोबत वॉर्नरने अनेक विक्रमांची नोंद केली. डेव्हिड वॉर्नरने ४१८ चेंडूचा सामना करताना नाबाद ३३५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. वॉर्नरने लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६१ धावा, स्टिव्ह स्मिथसोबत १२१ तर मॅथ्यू वेडसोबत ९९ धावांची भागीदारी केली.
वॉर्नरची पत्नी कँडिस हिने त्याच्या या खेळीमुळे त्याची स्तुती केली. त्याची प्रशंसा करताना त्याच्या पत्नीला महात्मा गांधींचा संदेश आठवला. तिने केलेल्या ट्विटमध्ये तिने महात्मा गांधी यांचा संदेश लिहिला आणि त्यानंतर वॉर्नरचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या. “(चांगली कामगिरी करण्यासाचे) सामर्थ्य हे कधीही शारीरिक बळातून येत नाही. अचाट अशा इच्छाशक्तीतून चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळते,” असे वाक्य लिहून त्यापुढे तिने कंसात महात्मा गांधी यांचे नाव लिहिले. त्यानंतर तिने वॉर्नरचे अभिनंदन केले. “लोक तुमच्याबाबत काय विचार करतात याचा विचार करू नका. तुम्ही स्वत:वर किती विश्वास ठेवता हे महत्त्वाचे असते, अशा शब्दात तिने वॉर्नरचे कौतुक केले.
Strength does not come from physical capacity. It comes from a indomitable will. (Mahatma Gandhi) It’s not important what other people believe about you. It’s only important what you believe about yourself. @davidwarner31 #335notout pic.twitter.com/Vlg9NVktj0
— Candice Warner (@CandyFalzon) November 30, 2019
दरम्यान, अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. पाकिस्तानचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर अपयशी ठरले. शाहीन आफ्रिदीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. अखेरीस ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९/३ वर घोषित केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 11:22 am