वेस्ट इंडिजवर ५८ धावांनी मात

मिचेल मार्श, मॅथ्यू वेड आणि जोश हेझलवूड या त्रिकुटाच्या दिमाखदार प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम लढतीत वेस्ट इंडिजवर ५८ धावांनी विजय मिळवीत जेतेपदावर नाव कोरले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १७३ अशी झाली होती. मात्र यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. ऑस्ट्रेलियाने २७० धावांची मजल मारली. वेडने ५२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. आरोन फिंचने ४७ तर स्टीव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजतर्फे जेसन होल्डर आणि श्ॉनॉन गॅब्रिएल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव २१२ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने ५ बळी घेतले. मिचेल मार्शने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजतर्फे जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४५ धावा केल्या. मिचेल मार्शला सामनावीर तर जोश हेझलवूडला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ९ बाद २७० (आरोन फिंच ४७, स्टीव्हन स्मिथ ४६, मॅथ्यू वेड ५७; जेसन होल्डर २/५१, श्ॉनोन गॅब्रिएल २/५८) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४५.४ षटकांत सर्वबाद २१२ (जॉन्सन चार्ल्स ४५, दीनेश रामदिन ४०, जसेन होल्डर ३४; जोश हेझलवूड ५/५०,  मिचेल मार्श ३/३२).

५/५०- वेस्ट इंडिजमधील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी. २९ धावांत ५ बळींसह मिचेल जॉन्सन सर्वोत्तम.