पराभवाने खचून न जाता नव्या दमाने उभे राहण्याची ऑस्ट्रेलियाची जिद्द अ‍ॅशेस मालिकेत पुन्हा अनुभवायला मिळाली. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे अ‍ॅशेस मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर गेलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त पलटवार करून इंग्लंडचा ४०५ धावांनी दणदणीत पराभव केला. विजयासाठी ठेवलेल्या ५०९ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने १०३ धावांमध्येच खुर्दा उडवला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या स्टिव्हन स्मिथला सामनावीराचा किताब देण्यात आला.
बिनबाद १०८ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ख्रिस रॉजर्स (४९), डेव्हिड वॉर्नर (८३), स्टिव्हन स्मिथ (५८) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या डावात ४९ षटकांत २५४ धावांची मजल मारली. २ बाद २५४ धावांवर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव घोषित करून इंग्लंडला विजयासाठी ५०९ धावांचे लक्ष्य दिले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडवरील दबाव प्रकर्षांने जाणवत होता. मिचेल स्टार्कने पाचव्याच षटकात सलामीवीर अ‍ॅडम लिथ याला माघारी पाठवून यजमानांना झटका दिला. त्यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श आणि नॅथन लिऑन यांना यश मिळाले. जॉन्सनने अनुभव पणाला लावत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जोश हेझलवूड आणि लिऑन यांनीही प्रत्येकी दोन बळी टिपले. इंग्लंडचा डाव अवघ्या ३७ षटकांत १०३ धावांवर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५६६. (दुसरा डाव) : २ बाद २५४ (डेव्हिड वॉर्नर ८३, स्टीव्हन स्मिथ ५८; मोईन अली २/७८).
इंग्लंड (पहिला डाव) : ३१२. (दुसरा डाव) : ३७ षटकांत सर्व बाद १०३ (गॅरी बॅलन्स १४; मिचेल जॉन्सन ३/२७, जोश हेझलवूड २/२०).