ओसाकाचे कारकीर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद

कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची करामत जपानच्या नाओमी ओसाकाने यावेळीही साधली. जपानच्या ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिचा सहज धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. ओसाकाचे हे एकू ण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे दुसरे जेतेपद ठरले.

शनिवारी रंगलेल्या जेतेपदाच्या लढतीत ओसाकाने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ब्रॅडी हिला डोके वर काढण्याची कोणतीच संधी दिली नाही. तिने हा सामना ६-४, ६-३ असा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

सेरेना विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, ओन्स जबेऊर आणि साय सू-वेई या अव्वल खेळाडूंवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ओसाकाने ब्रॅडी हिलाही सहज पराभूत केले. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच चार ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी ओसाका ही मोनिका सेलेसनंतरची (१९९१) दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. त्याचबरोबर चार ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या १५ जणींच्या मांदियाळीत ओसाकाने स्थान पटकावले.

तिसऱ्या मानांकित ओसाकाला ब्रॅडीने पहिल्या सेटमध्ये लढत दिली. ४-४ अशा स्थितीनंतर ओसाकाने ब्रॅडीची सव्‍‌र्हिस भेदली. त्यानंतर आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण मिळवत ओसाकाने पहिल्या सेटवर नाव कोरले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ओसाकाने धडाक्यात सुरुवात केली. ब्रॅडीची दोन वेळा सव्‍‌र्हिस मोडीत काढत ओसाकाने ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेट ६-३ असा सहज जिंकून तिने जेतेपद आपल्या नावावर केले.

४ओसाका हिने कारकीर्दीत चार ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली असून तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची दोन (२०१९, २०२१) तसेच अमेरिकन स्पर्धेची दोन (२०१८, २०२०) जेतेपदे मिळवली आहेत.

 

कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या जेनिफरचे अभिनंदन. अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ब्रॅडीवर विजय मिळवल्यानंतर ही पुढे आपल्यासाठी आव्हानात्मक ठरणार, याची कल्पना होती. माझा अंदाज खरा ठरला. आता करोनासारख्या कठीण परिस्थितीनंतर जेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे. माझ्यासह विलगीकरणात राहून माझ्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सहकाऱ्यांचे तसेच चाहत्यांचे मी आभार मानते. ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळणे हा अभिमान समजते आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी संयोजकांची आभारी आहे.   – नाओमी ओसाका