खेलरत्न नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या पुनियाच्या जखमेवर फुंकर

नवी दिल्ली : भारताचे नामवंत युवा मल्ल बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. यापूर्वीदेखील काही खेळाडूंना खेलरत्न मिळण्यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात खेलरत्न पुरस्कार न दिला गेल्याने नाराज झालेल्या बजरंग पुनियाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाविरोधात न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मंत्रालय आणि बजरंग यांच्यात संघर्ष उफाळून आला होता. अखेर खेलरत्न जाहीर झाल्याच्या दिवशीच बजरंगने केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. राष्ट्रकुल आणि आशियाईत सुवर्णपदक पटकावूनही अन्याय झाल्याची भावना त्याने बोलून दाखवली होती. तसेच या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. अखेरीस मार्गदर्शक योगेश्वर दत्त याच्या मध्यस्थीनंतर बजरंगने माघार घेत न्यायालयात न जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्या सर्व पाश्र्वभूमीवर या पद्मश्री पुरस्कारांच्या नामांकनाकडे बघितले जात आहे. त्यामुळे खेलरत्न न मिळाल्याने दुखावलेल्या बजरंगच्या जखमेवर ही फुंकर घालण्याचे प्रयास केले जात असण्याचीदेखील शक्यता आहे. विशेष म्हणजे त्या दोघांच्या नावाचे प्रस्ताव कुस्ती महासंघाने पाठवलेले नसून दोन्ही मल्लांच्या पालकांनीच पाठवले आहेत. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला खेलरत्न मिळण्यापूर्वी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याने वाद शमण्याची चिन्हे आहेत.