बेल्जियमपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या लिले स्टेडियमवर शुक्रवारी मध्यरात्री युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे वेल्सविरुद्धच्या या लढतीत बेल्जियमचे चाहते मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा असला तरीही बेल्जियमला वेल्सच्या गॅरेथ बॅलेचा झंझावात रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

चेल्सीचा आघाडीपटू इडन हझार्डच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर बेल्जियमने हंगेरीवर ४-० असा दणदणीत विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. केव्हिन डे ब्रुयनेने वेल्सविरुद्ध अजून गोलचा पाऊस पाडण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. बेल्जियमचा मध्यरक्षक ब्रुयने म्हणाला की, ‘‘बेल्जियमच्या सीमारेषेपासून जवळच होत असलेल्या या सामन्याची उत्सुकता आहे. त्यामुळे येथे अधिकाधिक चाहत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. या स्पध्रेत विजयरथ सुसाट धावतच राहो, ही आशा करतो.’’

हंगेरीवरील एकहाती विजयानंतर बेल्जियम १९८०च्या युरो चषक स्पध्रेप्रमाणे अंतिम फेरीत प्रवेश करेल अशी चाहत्यांना आशा आहे. हझार्डचा परतलेला फॉर्म ही बेल्जियमसाठी जमेची बाब आहे. बेल्जियमने प्रशिक्षक मार्क विल्मोट्स म्हणाले की, ‘‘आम्ही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असली तरी अजूनही आम्ही काहीच साध्य केलेले नाही.’’

वेल्सचे प्रशिक्षक ख्रिस कोलमन म्हणाले की, ‘‘उत्तर आर्यलडने कडवी लढत दिली. त्या सामन्यांतील चुकांची पुनरावृत्ती बेल्जियमविरुद्ध करणार नाही.’’

सामन्याची वेळ : रात्री १२.३०

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी ईएसपीएन, सोनी ईएसपीएन एचडी