अफगाणिस्तान विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने ५० षटकात ७ बाद २४९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने ४८.४ षटकात सामना जिंकला. या विजयासह विंडीजने मालिका ३-० अशी जिंकली. मात्र या सामन्यात विंडीजच्या अष्टपैलू खेळाडूला ICC ने दणका दिला.

२०१७ साली ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळलेला विंडीजचा निकोलस पूरन याच्यावर चेंडू कुरतडल्याप्रकरणी ICC ने बंदीची कारवाई केली आहे. चेंडूचा मूळ आकार कृत्रिम पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पूरनवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याच्या खात्यावर ५ डिमेरिट गुणदेखील जमा करण्यात आले आहेत. तिसऱ्या सामन्यात अंगठ्याच्या नखाने चेंडू कुरडताना आढळल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तो विंडीसाठीचे पुढील चार टी २० सामने मुकणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने सलामीला खेळत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावत त्याने ५० धावांची खेळी केली. असगर अफगाणने संघाला बळ दिले. त्याने ८५ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. याशिवाय अनुभवी मोहम्मद नबी यानेही ५० धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शाय होप याने दमदार शतक ठोकले. त्याने १४५ चेंडूत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. ब्रेंडन किंग (३९), निकोलस पूरन (२१), कायरन पोलार्ड (३२) आणि रॉस्टन चेस (नाबाद ४२) या चौघांनी त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे विंडीजला विजय मिळवणे सोपे झाले. शाय होपला सामनावीर तर रॉस्टन चेसला मालिकावीर घोषित करण्यात आले.