25 April 2019

News Flash

बलाढय़ आफ्रिकेवरही बांगलादेशचा विजय

युवा जोश आणि अनुभवाची जोड, यांचे मिश्रण असलेल्या बांगलादेश संघाने पाकिस्तान व भारतापाठोपाठ विश्वचषक स्पध्रेत उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या

| July 16, 2015 02:57 am

युवा जोश आणि अनुभवाची जोड, यांचे मिश्रण असलेल्या बांगलादेश संघाने पाकिस्तान व भारतापाठोपाठ विश्वचषक स्पध्रेत उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या बलाढय़ दक्षिण आफ्रिका संघाला एकदिवसीय मालिकेत नमवण्याचा पराक्रम गाजवला. घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याने प्रेरित झालेल्या बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेवर डकवर्थ लुईस प्रणालीनुसार ९ विकेट्स आणि ८३ चेंडू राखून दणदणीत विजय साजरा केला. बुधवारी आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी ४० षटकांत १७० धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. ते यजमानांनी २६.१ षटकांत एक फलंदाजाच्या मोबदल्यात सहज पार करून ही मालिका २-१ अशी खिशात टाकली.
या विजयाबरोबरच बांगलादेशने घरच्या मैदानावर सलग चार एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम केला. पाकिस्तान (३-०), भारत (२-१) यांच्याआधी बांगलादेशने झिम्बाब्वेची (५-०) शुभ्र धुलाई केली होती. अखेरच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे प्रथम फलंदाजी करायला आलेल्या आफ्रिकेला ४० षटकांत ९ बाद १६८ धावांवर समाधान मानावे लागले. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार बांगलादेशला १७० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. सलामीवीर तमीम इक्बाल (६१ नाबाद ) आणि सौम्या सरकार (९०) यांनी २६.१ षटकांतच यजमानांना विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक  
दक्षिण आफ्रिका : ९ बाद १६८ (डेव्हिड मिलर ४४, जेपी डय़ुमिनी ५१; मुस्ताफिझुर रहमान २/२४, शकिब अल हसन ३/३३, रुबेल होसेन २/२९) पराभूत वि. बांगलादेश : १ बाद १७० (तमीम इक्बाल नाबाद ६१, सौम्या सरकार ९०).

First Published on July 16, 2015 2:57 am

Web Title: bangladesh beat south africa win fourth series in a row