सब्बीर रहमानची अर्धशतकी खेळी
सब्बीर रहमानची ५४ चेंडूत ८० धावांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांचा भेदक मारा या एकत्रित कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत श्रीलंकेला नमवण्याची किमया केली. बांगलादेशने सब्बीरच्या अर्धशतकाच्या बळावर १४७ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेला १२४ धावाच करता आल्या. सब्बीर रहमानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हिरव्यागार खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पारंपरिक फटक्यांऐवजी आत्मघातकी फटके खेळण्यावर भर दिल्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. दिनेश चंडिमलने सर्वाधिक ३७ धावा केल्या. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (१२) आणि थिसारा परेरा (४) झटपट बाद झाल्याने श्रीलंकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. बांगलादेशतर्फे अल अमीनने ३ तर शकीब अल हसनने २ बळी घेतले. मुस्ताफिझूर रहमान, मश्रफी मुर्तझा आणि महमदुल्ला रियाझ यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.
तत्पूर्वी सब्बीर रहमानच्या ८० धावांच्या सुरेख खेळीच्या जोरावर बांगलादेशने १४७ धावांची मजल मारली. डावाच्या पहिल्याच षटकात अँजेलो मॅथ्यूजने मोहम्मद मिथुनला बाद केले. दुसऱ्या षटकात नुवान कुलसेकराने सौम्या सरकारला मॅथ्यूजकडे झेल देण्यास भाग पाडले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात भरवशाचा मुशफकीर रहीम माघारी परतला आणि बांगलादेशची ३ बाद २६ अशी अवस्था झाली. सब्बीर रहमान आणि शकीब अल हसन जोडीने चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. सब्बीरने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावांची वेगवान खेळी केली. शकीबने ३२ धावा केल्या. महमदुल्लाने १२ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह २३ धावांची उपयुक्त खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १४७ (सब्बीर रहमान ८०; दुश्मंत चमिरा ३/३०) विजयी विरुद्ध श्रीलंका : २० षटकांत ८ बाद १२४ (दिनेश चंडिमल ३७; अल अमीन ३/३४)