बार्सिलोनाने पॅरिस सेंट-जर्मेनवर मात करत तर बायर्न म्युनिचने ज्युवेन्टसला नमवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाची पॅरिस सेंट जर्मेनविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली होती. मात्र या सामन्यात पिछाडी भरून काढत जर्मेनवर मात करण्यात त्यांनी यश मिळवले.
जेव्हियर पास्टोरने शानदार गोल करत जर्मेनचे खाते उघडले. मात्र लिओनेल मेस्सी बदली खेळाडू म्हणून मैदानात आल्यानंतर बार्सिलोनाच्या खेळात सातत्य आले. बार्सिलोनातर्फे प्रेडोने ७१व्या मिनिटाला गोल करत बरोबरी करून दिली.
 प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर केलेल्या गोलच्या आधारे बार्सिलोनाने सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
दुसऱ्या लढतीत बायर्न म्युनिचने ज्युवेन्टसला २-० असे नमवले. मारियो मंडुझुकिकने ६४व्या मिनिटाला, तर क्लॉडिओ पिझारोने ९१व्या अर्थात अतिरिक्त वेळेत गोल करत बायर्न म्युनिचच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.