२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याचं वृत्त समोर आलं होतं. संघाला पाठीमागे सोडून रोहित शर्मा आपली बायको आणि मुलगी यांच्यासमोबत एकटा मुंबईत दाखल झाल्यानंतर, टीम इंडियात पडलेल्या फुटीची अधिक चर्चा व्हायला लागली. विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजी क्रमावरुन दोघांमध्ये मतभेद झाल्याचं समोर आलं आहे. मात्र बीसीसीआय आता या दोन्ही खेळाडूंचं मनोमीलन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं समजतं आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेचे प्रशिक्षक भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी भारतीय संघासमोर अमेरिकेला जाणार आहेत. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये, अमेरिकेच्या शिकागो येथे दोन टी-२० सामने खेळतील. राहुल जोहरी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करुन दोघांचं मनोमीलन करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याचं समजतंय.

सध्याच्या घडीला जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक मतं मिळायला लागतात, त्यावेळी गोष्टी बिघडू शकतात. रोहित आणि विराट हे दोघंही प्रग्लभ खेळाडू आहेत, त्यामुळे दोघांमधले मतभेद बाजूला ठेऊन संघासाठी एकत्र यायचं याची त्यांना जाण आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली. भारतीय संघासमोर आता वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.