भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. पण महत्वाची बाब म्हणजे पीटीआयच्या वृत्तानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे ६० पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान २ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ३० जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे.

२०१७ मध्ये रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती होण्याआधी BCCI ने ९ अटींची एक यादी जारी केली होती. पण त्या यादीत काही गोष्टींबद्दल संभ्रम होता. पण यंदाच्या यादीत मात्र केवळ ३ अति ठेवण्यात आल्या आहेत. “सध्याचे प्रशिक्षक नव्या प्रशिक्षकपदाच्या भरतीच्या मुलाखतीसाठी आपोआपच निवडले गेले आहेत”, अशी माहितीही BCCI कडून देण्यात आली आहे. मात्र नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आले आहे.

मुख्य प्रशिक्षकपदी अर्ज करणाऱ्याने किमान २ वर्षांसाठी एखाद्या कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या संघाचे प्रशिक्षक पद भूषवले असायला हवे किंवा ICC चे संलग्न सदस्य संघ / या संघ / IPL संघाचे ३ वर्ष प्रशिक्षकपद सांभाळण्याचा अनुभव हवा. तसेच अर्जदाराला ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव हवा.

सध्याच्या प्रशिक्षक वर्गाला ४५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. यापैकी सर्व जण या पदासाठी अर्ज करू शकतात. पण ते असले तरी भारतीय संघाला नवे फिटनेस ट्रेनर आणि फिजिओ मिळणार आहेत. कारण सध्याच्या या २ प्रशिक्षकांनी कार्यकाळ सम्पल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.