ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राज हिला वगळल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रशासकीय समिती आता भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मिताली राजला वादग्रस्त पद्धतीने वगळल्याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापन, हरमनप्रीत यांच्यावर कडाडून टीका झाली होती. मिताली आपले म्हणणे लेखी स्वरूपात महिला क्रिकेटचे प्रमुख आणि बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांच्याकडे मांडणार आहे, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘‘लवकरच बीसीसीआयची प्रशासकीय समिती हरमनप्रीत, मिताली आणि प्रशिक्षक रमेश पोवार तसेच व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य आणि दौरा निवड समिती प्रमुख सुदा शाह यांच्याशी वैयक्तिकपणे बैठक घेऊन चर्चा करणार आहे. मितालीला संघातून वगळण्यामागचे कारण समजून घेतले जाणार आहे,’’ असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

संघनिवडीबद्दल खेळाडूंचे खासगी व्यवस्थापक विविध आरोप करत असल्यामुळे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. भारतीय महिला संघाशी निगडित असलेल्या लोकांनीच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे ही गंभीर बाब आहे,’’ असे राय यांनी म्हटले आहे.

मितालीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका अनिशा गुप्ता नावाच्या महिलेने भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत हिच्यावर गंभीर आरोप केले होते. हरमनप्रीत धोकेबाज, खोटारडी आणि पदाला योग्य नसलेली खेळाडू आहे, अशा शब्दांत अनिशाने आरोप केल्यानंतर राय यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापन तसेच महिला संघाशी निगडित असलेल्या लोकांनी संयम बाळगावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.