सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर आता संघटनेत बदलांचे वारे वाहु लागले आहेत. २२ नोव्हेंबरला विराट कोहलीचा भारतीय संघ कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआय तयारीला लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना या सामन्यासाठी निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

या कसोटी सामन्याला पंतप्रधान मोदी यांनी हजर रहावं यासाठी पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून २००० साली बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या संघाच्या सदस्यांचांही सन्मान करण्यात येणार आहे. त्यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तसंच पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, अभिनव बिंद्रा, एम. सी. मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आदींनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.

अवश्य वाचा – कर्णधारपदाबद्दल रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला….

३ नोव्हेंबरपासून बांगलादेश आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. कर्णधार विराट कोहलीला टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. दरम्यान पहिल्या दिवस रात्री कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने तब्बल ७२ गुलाबी चेंडूची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.