आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपदावरून दूर होऊन बराच कालावधी झाला, तरी अजूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माझ्यावर नाराज का आहे हे मला अद्याप कळू शकलेले नाही, असे आयसीसीचे माजी अध्यक्ष व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉरगट यांनी येथे सांगितले.
लॉरगट हे आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजनांवरून त्यांचे बीसीसीआयबरोबर मतभेद झाले होते. लॉरगट म्हणाले, अध्यक्षपद सोडून मला दोन वर्षे झाली असली, तरी अद्याप बीसीसीआयच्या नाराजीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनाही ही माहिती मिळालेली नाही. २०१३ मध्ये आमच्या देशात भारतीय संघाने दौरा केला होता. या दौऱ्याचे वेळी बीसीसीआयशी माझे मतभेद झाले होते. मात्र हा दौरा देखील आटोपून खूप कालावधी झाला आहे. मला आशा आहे की बीसीसीआयची माझ्यावरील खप्पा मर्जी लवकरच दूर होईल. माझ्याकडून काही नकळत चुका झाल्या असल्या, तर त्याबाबत माफी मागण्याची तयारीही मी केली आहे. तथापि, माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत हे कळल्यानंतरच मी दिलगिरी व्यक्त करू शकेन.
गतवर्षी भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांच्या संघटकांनी आयसीसीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या संदर्भात लॉरगट म्हणाले, या प्रस्तावामध्ये अनेक बदल सुचविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष मंजूर प्रस्तावात थोडेच बदल करण्यात आले. नेन्झानी यांचे समाधान करण्यासाठी मोजकेच बदल झाले. अनेक चांगल्या सूचना फेटाळण्यात आल्या.
जगातील क्रिकेटची सत्ता मोजक्याच संघटकांच्या हातात देण्यास आमचा विरोध होता. खेळात कोणाचीही मक्तेदारी असू नये असे आमचे स्पष्ट मत होते. मंडळास होणाऱ्या उत्पन्नाचे ज्या प्रकारे विभाजन केले जाते, त्यास आमचा विरोध आहे. छोटय़ा देशांचे त्यामध्ये खूप नुकसान होत आहे हे आम्ही दाखवून दिले होते मात्र आमच्या मतांचा गांभीर्याने विचार केला गेला नाही.