भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर रवी शास्त्री यांनाही पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.

शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा विद्यमान साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समावेश आहे. विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्यामुळे या सर्वाना ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला आयसीसीच्या कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेवर नाव कोरता आले नाही. मात्र भारताने यावर्षी ऑस्ट्रेलियन भूमीत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली होती.

‘‘एक-दोन दिवसांत संकेतस्थळावर या पदांसाठी तसेच संघ व्यवस्थापकपदासाठीही अर्ज मागवण्यात येतील,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताची संघनिवड शुक्रवारी

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवार, १९ जुलै रोजी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. मुंबई येथे ही निवड होणार असून या दौऱ्यात भारतीय संघ प्रत्येकी तीन ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर उभय संघांमध्ये दोन कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत. ३ ऑगस्टपासून ट्वेन्टी-२० मालिकेद्वारे या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. ‘‘धोनीच्या निवृत्तीविषयी निवड समितीला अद्याप काहीही कळवण्यात आलेले नाही. विंडीज दौऱ्यासाठी आम्ही नव्या खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहोत. विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांना विश्रांती देण्याचा विचार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.