क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी इंग्लंडने विजेतेपद पटकावलं होतं. निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर जेतेपद बहाल करण्यात आलं. ज्यावरुन नंतर वादही झाला, त्यामुळे आयसीसीने चौकारांच्या निकषाचा निर्णय रद्द केला. बेन स्टोक्सने या सामन्यात बहारदार खेळी करताना इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्टोक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने हातातून निसटत चाललेला सामना बरोबरीत सोडवला. अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू चांगलेच तणावाखाली होते. साहजिकच स्टोक्सवरही हा तणाव होता. मोक्याच्या प्रसंगी स्वतःला शांत करण्यासाठी स्टोक्सने सुपरओव्हर ब्रेकमध्ये सिगारेट प्यायलाचा गौप्यस्फोट ‘Morgan’s Men: The Inside Story of England’s Rise from Cricket World Cup Humiliation to Glory’ या पुस्तकात केला आहे.

“मैदानात २७ हजारांच्या घरात प्रेक्षक, टीव्ही कॅमेरे आणि सुपरओव्हरमुळे निर्माण झालेली उत्सुकता…या सर्व परिस्थितीत लॉर्ड्स मैदानावर एकांत मिळेल अशी जागा मिळणं खूप कठीण होतं. पण बेन स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळला होता. या मैदानातला प्रत्येक कोपरा त्याला माहिती होता. कर्णधार इयॉन मॉर्गन आपल्या संघाला शांत करुन नवीन रणनिती आखण्यात व्यस्त असताना स्टोक्सने संघापासून वेगळं राहणं पसंत केलं. तो पूर्णपणे घामाने भिजला होता. २ तास २७ मिनीटं फलंदाजी करत अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्यानंतर तणाव येणं साहजिक होतं. अशावेळी स्टोक्सने काय केलं असेल?? त्याने संघाच्या ड्रेसिंग रुममागे जाऊन, वॉशरुममध्ये जात एक सिगारेट प्यायली आणि स्वतःला शांत केलं.” निक हौल्ट आणि स्टिव्ह जेम्स या लेखकांनी आपल्या पुस्तकात या प्रसंगाबद्दल लिहीलं आहे.

असा रंगला होता सामना-

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

२४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर (५९) बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्याने नाबाद ८४ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.