फ्रान्सचा बचावपटू बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात मारलेला गोल हा विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोल असल्याची घोषणा बुधवारी ‘फिफा’कडून करण्यात आली.

ल्युकास हेरांडेजकडून मिळालेल्या पासवर उजव्या पायाने अफलातून फटका लगावत केलेला गोल हा तांत्रिकदृटय़ा अप्रतिम गोल असल्याचे फिफाच्या वतीने जाहीर करण्यात आले. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला त्याने केलेल्या या गोलमुळे फ्रान्सला त्यावेळी २-२ अशी बरोबरी साधता आली. त्यानंतर फ्रान्सने तो सामना ४-३ असा जिंकला. विश्वचषकातील १६९ गोलपैकी तो सर्वोत्तम असल्याचे प्रेक्षकांच्या मताद्वारे स्पष्ट झाले. त्या गोलला कोलंबियाचा मध्यरक्षक ज्युआन क्विंटेरो याने जपानविरुद्ध फ्री किकवर मारलेला गोल आणि क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रीचने अर्जेंटिनाविरुद्ध केलेल्या गोलपेक्षा अधिक जनसमर्थन मिळाले.