चेन्नई : २०१४-१५च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा सलामीवीर मुरली विजयने छाप पाडली होती. आता पुन्हा एकदा तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासाठी उपयुक्त योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्याआधी आम्हाला सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. संघाच्या विजयात हातभार लावणे तसेच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी उत्तम तयारी केली आहे. संघातील सर्व खेळाडू एकत्र येऊन चांगली कामगिरी करतील, अशी आशा मुरली विजयने व्यक्त केली आहे.

तो म्हणाला की, ‘‘नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात मी भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ा तसेच वातावरण सारखेच असल्यामुळे या दौऱ्याचा मला नक्कीच फायदा होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मी सध्या चांगल्या तयारीत आहे. परिस्थितीनुसार कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.’’

गेल्या वर्षी झालेल्या मनगटाच्या दुखापतीनंतर मुरली विजयचे संघातील स्थान डळमळीत झाले आहे. त्याविषयी त्याने सांगितले की, ‘‘गेल्या वर्षी झालेल्या दुखापतीनंतर मी माझ्या मनाप्रमाणे फलंदाजी करू शकत नाही. पण दुखापत लक्षात ठेवूनच फटक्यांची निवड करणार आहे. या कालावधीत मला बरेच काही शिकता आले.’’