तुफान फॉर्ममध्ये असणारा जो रुट याला बाद करत अक्षर पटेल यानं इंग्लंड संघाला मोठा झटका दिला आहे. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं आपल्या दुसऱ्याच षटकांत जो रुटला अश्विनकरी झेलबाद केलं. अक्षरच्या चेंडूला स्वीप करण्याच्या प्रयत्नात अश्विनकडे झेल देत रुट बाद झाला. रुटनं १२ चेंडूत फक्त सहा धावा केल्या. पहिल्या सामन्यात जो रुट यानं द्विशतकी खेळी करत इंग्लंड संघाच्या विजयाचा पाया रचला होता. पण दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेल यानं भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला आहे.  अक्षर पटेल याचा कसोटीतील पहिला बळी जो रुट ठरला आहे.

उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकानंतर चार गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या आहेत. सध्या बेन स्टोक्स आणि खेळत आहे. सलामीवीर बर्न्सला शून्य धावसंख्येवर इशांत शर्मानं बाद केलं. तर अश्विन यानं सिब्ली याला १६ धावांवर विराटकडे झेल देण्यास भाग पाडलं. तर अक्षरनं जो रुटचा अडथळा दूर केला.

असा झाला जो रुट बाद

सलामीवीर रोहित शर्माची (१६१) दर्जेदार शतकी खेळी आणि अजिंक्य रहाणे (६७) आणि ऋषभ पंत (नाबाद ५८) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३०० अशी धावसंख्या उभारली होती. नाबाद राहणाऱ्या ऋषभ पंत यानं आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षठकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला.

दुसऱ्या दिवशी अक्षर पटेल लगेच तंबूत परतल्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारतानं चार गडी गमावले. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र, त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतनं दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीनं सर्वाधिक चार बळी घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन यानं तीन बळी घेत भारतीय संघाला अडचणीत टाकलं. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली.