विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीज दौरा केला. विंडीज दौरा आणि त्यानंतर घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निवड समितीने तरुण खेळाडूंना संधी दिली. कुलदीप यादव-युजवेंद्र चहल यांना मर्यादीत षटकांच्या संघात विश्रांती देण्यात आली. मात्र आता या दोन्ही खेळाडूंना पुन्हा एकदा संघात स्थान देण्याची वेळ आली असल्याचं मत, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.

“कुलदीप आणि चहलला विश्रांती म्हणून संघात स्थान दिलं नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र विराटला आता दोन्ही खेळाडूंना संघात स्थान द्यायला हवं. हे दोन्ही फिरकीपटू भारतीय संघासाठी महत्वाचे आहेत. भारतीय संघात सध्या दोन डावखुऱ्या फिरकीपटूंची गरज नाहीये. (रविंद्र जाडेजा-कृणाल पांड्या) गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली नाही पण ही फारशी चिंतेची बाब नाही.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राल लिहीलेल्या आपल्या कॉलममध्ये गांगुलीने हे मत मांडलं आहे.

नुकत्याच आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारताला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. यानंतर भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – चहूबाजूंनी टीका होत असतानाही गांगुली म्हणतो, पंतच भारतीय संघासाठी योग्य!