आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील पहिला सामना पंजाबने १४ धावांनी जिंकला. मात्र या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला तो म्हणजे सलामीवीर जोस बटलरची विकेट. मंकड पद्धतीने पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बटलरला बाद केले. त्यामुळे अश्विनच्या खिळाडूवृत्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वत: बटलरलाही अश्विनने केलेला हा प्रकार आवडला नाही हे त्याने मैदानावरच दाखवून दिले. मात्र सामना संपल्यानंतरही बटलरने अश्विनशी हात मिळवणे टाळले. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नक्की काय झाले

सामन्याच्या १३ व्या षटकामध्ये 69 धावांवर खेळणारा बटलर नॉन स्ट्रायर्स एण्डला होता. गोलंदाजी करणाऱ्या अश्विनने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांवरील बेल्स उडवल्या. ज्यावेळी अश्वीनने बेल्स उडवल्या तेव्हा बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर होता. अश्विनने अपील केल्यानंतर पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनीही मंकड नियमाप्रमाणे बटलरला बाद ठरवले. बटलर धावबाद झाल्यानंतर राजस्थान संघाची पडझड झाली आणि ते सामना १४ धावांनी हरले.

अश्विनने अशापद्धतीने बटलरला बाद केल्यानंतर सोशल नेटवर्किंगवरून त्याच्यावर अनेकांनी टिका केली. तर काहीजणांनी अश्विनने केलेले कृत्य नियमांत बसणारे असल्याने त्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. अश्विननेही धावबादची अपिल केल्यानंतर बटलरला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने मैदानात यावरुन अश्विनशी वादही घातला. अखेर पंचांनी बाद दिल्यानंतर बटलरला माघारी परतावे लागले. ४३ चेंडूत ६९ धावांवर खेळणाऱ्या बटलरला अशापद्धतीने बाद देण्यात आल्याने तो चांगलाच चिडला होता. पंजाबने समाना जिंकल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदान सोडण्याआधी हस्तांदोलन करतानाही बटलरने अश्विनशी हस्तांदोलन करणे टाळले. बटलरच्या या वागण्याने अश्विन गोंधळल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

मात्र अश्विनने सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘असे क्षण सामन्याला कलाटणी देणारे ठरतात. त्यामुळे फलंदाजांनी सावध रहायला हवे’ असं मत व्यक्त करत आपली बाजू मांडली. बटलर – अश्निनप्रकरणामुळे आयपीएलमधील खिळाडूवृत्तीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.