प्रणॉय आणि श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था, बासेल

माजी ऑलिम्पिक विजेत्या लिन डॅनवर दुसऱ्या फेरीत सरशी साधणाऱ्या भारताच्या एच. एस. प्रणॉयचे आव्हान जपानचा अव्वल मानांकित खेळाडू केंटो मोमोटा याने संपुष्टात आणले. मात्र पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत यांनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपापले सामने सहज जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मोमोटाने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात २१-१९, २१-१२ अशा फरकाने प्रणॉयला धूळ चारली. त्यानंतर झालेल्या सामन्यांमध्ये, पाचव्या मानांकित पी. व्ही. सिंधू हिने अमेरिकेच्या बेईवेन झँग हिचा २१-१४, २१-६ असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

सिंधू बहरात असल्यामुळे नवव्या मानांकित झँगचा तिच्यासमोर निभाव लागला नाही. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या ताय झू यिंग हिच्यशी लढत द्यावी लागेल. भारताच्या १६व्या मानांकित बी. साईप्रणीतने जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या अँथनी जिनटिंग याला २१-१९, २१-१३ असे हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सातव्या मानांकित किदम्बी श्रीकांत याला थायलंडच्या १२व्या मानांकित कँटाफोन वँगचॅरेओन याने १४-२१, १३-२१ अशी धूळ चारली.

लिन डॅनवरील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या बिगरमानांकित प्रणॉयने दमदार सुरुवात करत मोमोटाला कडवी लढत दिली. अटीतटीच्या रंगलेल्या पहिल्या गेममध्ये प्रणॉयने मोमोटाला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. मोमोटाने ८-६ अशी मुसंडी मारल्यानंतर प्रणॉयने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत १२-१२ आणि नंतर १५-१५ अशी बरोबरी साधली. मोमोटाच्या प्रत्येक चालीला प्रणॉयने तितक्याच ताकदीने उत्तर दिले. मोमोटाचे फटके नेटवर गेल्यामुळे प्रणॉयला सामना १९-१९ अशा रंगतदार स्थितीत आणता आला, पण अखेरच्या क्षणी खेळ उंचावण्यात प्रणॉयला अपयश आले. दोन्ही गुण सहजपणे मोमोटाला बहाल करत प्रणॉयला पहिल्या गेमवर पाणी सोडावे लागले.

दुसऱ्या गेमवर मात्र मोमोटाचे वर्चस्व राहिले. मोमोटाने प्रदीर्घ रॅलीवर भर देत प्रणॉयला गुण मिळवण्यासाठी झुंजवले. मोमोटाने ८-४ अशी आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. प्रणॉयचे खेळावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोमोटाला १३-६ अशी भक्कम आघाडी घेता आली. त्यानंतर लागोपाठ गुण मिळवून मोमोटाने दुसरा गेम २१-१२ अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.