बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन हंगामाबाबत कडक नियमावली तयार केली आहे. यंदा आयपीएलमध्ये सॉफ्ट सिग्नल काढून टाकण्यासोबत 90 मिनिटात 20 षटके पूर्ण करण्याच्या नियमाचाही या नियमावलीत समावेश करण्यात आला आहे. शिवाय, षटकांची गती राखता आली नाही, तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची शिक्षा होणार आहे

नियमावलीनुसार, तीन सामन्यांत षटकांची गती राखता आली नाही, तर कर्णधारावर एका सामन्यावर बंदी घालण्याची तरतूद बोर्डाने केली आहे. पहिल्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 12 लाख, दुसऱ्यांदा असे झाल्यास 24 लाख आणि तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास 30 लाख अशी दंड रक्कम वसूल केली जाईल. तिसऱ्या चुकीमुळे 30 लाखांचा दंड आणि सामनाबंदी या दोन्ही शिक्षा कर्णधाराला होणार आहेत.

आयपीएलमधून सॉफ्ट सिग्नल बाद

आयपीएल 2021(इंडियन प्रीमियर लीग) हंगाम सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह शॉर्ट रन आणि नो-बॉलबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधून सॉफ्ट सिग्नल कमी केल्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील, त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही. जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे, तो तिसरे पंचच घेतील. याबरोबर शॉर्ट रन व नोबॉलचा अंतिम निर्णयही तिसऱ्या पंचांचा राहील.

शॉर्ट रनबाबत….

शॉर्ट रनबाबतचा निर्णय मैदानावरील पंच घेत असतात. मात्र, आता आयपीएलमध्ये यात तिसऱ्या पंचांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. तिसऱ्या पंचांना जर वाटले की मैदानावरील पंचांनी शॉर्ट रनबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे, तर तिसरे पंच मैदानावरील पंचांचा निर्णय बदलू शकतात. याबरोबरच नो-बॉलबाबतचा मैदानावरील पंचांचा निर्णय देखील तिसरे पंच बदलू शकतात.