आज निर्णायक सामना जिंकण्याचे भारतापुढे आव्हान; ऑस्ट्रेलिया संघात स्टार्कचा समावेश

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारातील सलग सात मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघापुढे आठवी मालिका किमान बरोबरीत सोडवण्याचे आव्हान समोर आहे. रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासह मालिका वाचवायची असेल तर ऑस्ट्रेलियाची आघाडीची फलंदाजांची फळी भारताच्या गोलंदाजांना लवकर भेदावी लागणार आहे.

शुक्रवारी मेलबर्न येथे ट्वेन्टी-२० मालिकेत बरोबरी साधण्याची नामी संधी भारताला चालून आली होती. मात्र १९ षटकांत ऑस्ट्रेयिलाची ७ बाद १३२ अशी अवस्था केल्यानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर विजय मिळाल्यास विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आत्मविश्वासाने अ‍ॅडलेडला ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीला सामोरे जाता येणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या २०१६मधील मागील दौऱ्यात भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. चालू मालिकेत ब्रिस्बेनमधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघ मेलबर्नला उत्तमपणे सावरला होता. वेगवान आणि फिरकी माऱ्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अखेपर्यंत दडपण ठेवले होते. आता निर्णायक लढतीत भारतीय संघात बदल न करण्याचे संकेत कोहलीने दिले आहेत. सिडनीची खेळपट्टी ही धिमी असल्यामुळे अष्टपैलू खेळाडू कृणाल पंडय़ासुद्धा संघात असेल. युजवेंद्र चहलला संघात स्थान द्यायचे असेल, तर वेगवान गोलंदाज खलील अहमदला विश्रांती द्यावी लागणार आहे.

शुक्रवारी सामन्याआधीच्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बिल स्टॅनलेकच्या पायाचा घोटा दुखावला आहे. त्यामुळे तो निर्णायक सामन्याला मुकणार आहे. स्टॅनलेकच्या जागी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा संघात समावेश करण्यात आला आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिन्च (कर्णधार), अ‍ॅश्टॉन अगर, जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन कोल्टर-नाइल, ख्रिस लिन, बेन मॅकडरमॉट, ग्लेन मॅक्सवेल, डी’आर्सी शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, अँड्रय़ू टाय, अ‍ॅडम झम्पा.

२०

वेस्ट इंडिजमध्ये एकमेव सामन्याची मालिका गमावल्यानंतर जुलै २०१७पासून भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिका गमावली नाही. भारताने या कालखंडात विविध वातावरणात २७ सामन्यांपैकी २० सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ सलग नऊ सामन्यांमध्ये अपराजित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर २०१७मधील दोन सामन्यांची मालिका भारताने बरोबरीत सोडवली होती.

सामन्याची वेळ : दुपारी १.२० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.