चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सज्ज असलेल्या बार्सिलोनाला ‘क’ गटात पहिल्याच सामन्यात केल्टिक क्लबचा सामना करावा लागणार आहे. या लढतीपूर्वी ला लीगा फुटबॉल स्पध्रेत नवख्या अल्वेस क्लबकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे बार्सिलोनाला दमदार पुनरागमन करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. कॅम्प नाऊ येथे होणाऱ्या या लढतीत यजमान बार्सिलोनाचे पारडे जड वाटत असले तरी केल्टिकही कडवे आव्हान देण्यासाठी तयार आहेत.

गतआठवडय़ात अल्वेसविरुद्ध लिओनेल मेस्सी व लुईस सुआरेझ यांना विश्रांती देण्याचा निर्णय प्रशिक्षक लुईस एन्रिक यांच्या चांगलाच अंगलट आला. त्यामुळे ही चूक चॅम्पियन्स लीग स्पध्रेत करण्याचे धाडस ते पुन्हा दाखवणार नाही. कॅम्प नाऊ येथे बार्सिलोना आणि केल्टिक क्लब २०१३ साली अखेरचे एकमेकांविरुद्ध खेळले होते आणि त्यात बार्सिलोनाने ६-१ असा विजय निश्चित केला. तसेच या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या लढतीत बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने केल्टिकचे आव्हान सहज परतवले होते. २०१२ साली केल्टिकने (२-१) बार्सिलोनावर अखेरचा विजय मिळवला होता. आकडेवारी बार्सिलोनाच्या बाजूने असली तरी अल्वेसविरुद्धच्या पराभवाने त्यांचे मनोबल खचले आहे आणि त्याचा केल्टिकला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

सामन्याची वेळ : मध्यरात्री १२:१५ वाजल्यापासून