लिस्बन : चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम लढत बायर्न म्युनिक आणि पॅरिस सेंट जर्मेन यांच्यात येत्या रविवारी होणार आहे. सर्जी गनाब्रीच्या दोन गोलांसह रॉबर्ट लेवानडोस्कीच्या गोलमुळे बायर्न म्युनिकने बुधवारी उपांत्य लढतीत लियॉनला ३-० नमवले.

गनाब्रीने १८व्या आणि ३३व्या मिनिटाला झटपट गोल करत सुरुवातीलाच बायर्न म्युनिकला २-० अशी दणदणीत आघाडी मिळवून दिली. लियॉनलादेखील सुरुवातीलाच गोल करण्याच्या दोन संधी होत्या, मात्र त्या त्यांनी दवडल्या. लेवानडोस्कीने ८६व्या मिनिटाला बायर्नसाठी तिसरा गोल केला. गनाब्री आणि लेवानडोस्की या दोघांचे मिळून चॅम्पियन्स लीग हंगामात २४ गोल झाले आहेत. बायर्नचे या स्पर्धेत यंदाच्या हंगामात ४२ गोल झाले असून पॅरिस सेंट जर्मेनचे २५ गोल झाले आहेत.

या स्पर्धेच्या इतिहासात २२ वर्षांनंतर प्रथमच दोन देशांतर्गत फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ एकमेकांविरुद्ध चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत भिडणार आहेत. याआधी रेयाल माद्रिद आणि युव्हेंटस या दोन देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या संघांमध्ये १९९८ मधील या स्पर्धेची अंतिम लढत खेळण्यात आली होती. बायर्नचा हा सर्व स्पर्धामधील मिळून सलग २०वा विजय ठरला. लेवानडोस्कीचे या हंगामात सर्व स्पर्धामध्ये मिळून ५५ गोल झाले आहेत. या स्पर्धेत सलग नवव्यांदा त्याने गोल केला.

युरोपा लीगची आज अंतिम लढत

युरोपा लीग फुटबॉलची अंतिम लढत शुक्रवारी सेव्हिया आणि इंटर मिलान यांच्यात होत आहे. सेव्हियाने युरोपा लीगच्या अंतिम फेरीत आतापर्यंत पाच वेळेला प्रवेश केला असून पाचही वेळेला विजेतेपद पटकावले आहे. २०१४ ते २०१६ अशी सलग तीन वर्ष युरोपा लीगचे विजेतेपद सेव्हियाने पटकावले होते. सेव्हियाला युरोपा लीग सोडले तर अन्य मोठय़ा स्पर्धाचे विजेतेपद २०१० (कोपा डेल रे) नंतर पटकावता आलेले नाही.

* वेळ : मध्यरात्री १२:३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन २.