गतविजेता बायर्न म्युनिचने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये विक्रमी सलग १४वा विजय नोंदवला. त्यांनी साल्झबर्गवर ६-२ असा विजय मिळवला.

बायर्न म्युनिचने ६६व्या मिनिटाला झालेल्या २-२ या बरोबरीतून दणदणीत विजयाची नोंद केली. रॉबर्ट लेव्हानडोवस्कीचे दोन गोल (२१वे आणि ८८वे मिनिट) बायर्नच्या विजयात मोलाचे ठरले. रॅसमस क्रिस्टेनसनने (४४वे मिनिट) स्वयंगोल करत बायर्नच्या गोलांमध्ये भर घातली. जेरोमी बोटेंग (७९वे मिनिट), लिरॉय सेन (८३वे मिनिट), लुकास हर्नाडेझ (९०+२वे मिनिट) यांनीदेखील बायर्नकडून प्रत्येकी एका गोलाचे योगदान दिले. जोशुया किमीचने दिलेले महत्त्वपूर्ण पास बायर्नच्या विजयात मोलाचे ठरले. याबरोबरच ‘अ’ गटात सलग तीन विजयांसह ९ गुण मिळवत बायर्नने अव्वल स्थान भक्कम केले. अखेरच्या १० मिनिटांमध्ये साल्झबर्ग संघाची बचावफळी पूर्णपणे दडपणात आली. त्याचा बायर्नने पुरेपूर फायदा घेतला.

रेयाल माद्रिद विजयपथावर

माद्रिद : रेयाल माद्रिदने यंदाच्या चॅम्पियन्स लीग हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी इंटर मिलानवर ३-२ असा विजय मिळवला. ‘ब’ गटात चार गुणांसह रेयाल माद्रिद चौथ्या स्थानी आहे. बदली खेळाडू म्हणून आलेल्या रॉड्रिगोने ८०व्या मिनिटाला केलेला गोल रेयाल माद्रिदच्या विजयात मोलाचा ठरला. तत्पूर्वी करिम बेन्झेमा आणि सर्जियो रॅमोस यांच्या सुरुवातीच्या गोलांमुळे रेयाल माद्रिदकडे ३३व्या मिनिटाला २-० अशी आघाडी होती. मात्र लॉटॅरो मार्टिनेझ (३५वे मिनिट) आणि इवान पेरिसीच (६८वे मिनिट) यांच्या गोलांमुळे इंटर मिलानला बरोबरी साधता आली होती. अखेर ब्राझीलच्या रॉड्रिगोने रेयाल माद्रिदच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

सिटीचा सलग तिसरा विजय

मँचेस्टर : मँचेस्टर सिटीने ‘क’ गटातून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. सिटीने फेरान टोरेसच्या गोलच्या जोरावर ऑलिम्पियाकोसला ३-० असे पराभूत केले. टोरेसला यंदाच्या हंगामातील या स्पर्धेत सलग तिसऱ्या लढतीत गोल करण्यात यश आले. टोरेसला याच हंगामात स्पेनमधील संघ व्हॅलेन्सियाकडून सिटीने करारबद्ध केले होते. टोरेसने त्याची निवड सिद्ध केली. टोरेसने १२व्या मिनिटाला गोल केल्यावर गॅब्रियल जेसस (८१वे मिनिट) आणि जोओ कॅन्सेलो (९०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एका गोलाचे योगदान सिटीच्या विजयात दिले.

जोटाची हॅट्ट्रिक; लिव्हरपूलचा पहिला विजय

बर्गामो : दिओगो जोटाच्या तीन गोलांच्या जोरावर लिव्हरपूलने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. लिव्हरपूलने अटलांटावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. गेल्या काही दिवसांतील दणदणीत कामगिरी जोटाने या सामन्यातही दाखवली. चमकदार कामगिरी करत जोटाने सॅडियो माने, मोहम्मद सालाहसारखे खेळाडू असतानाही संघातील स्थान बळकट केले आहे. जोटाचे हे गेल्या चार लढतींतील सहा गोल ठरले आहेत. या विजयामुळे लिव्हरपूलला ‘ड’ गटात पाच गुणांसह अव्वल स्थान राखता आले आहेत. व्हॉल्व्ह्जकडून सप्टेंबरमध्येच जोटा लिव्हरपूलशी करारबद्ध झाला होता. त्याने त्याची निवड सार्थ ठरवली आहे.