रैना आणि हसी यांच्या दणकेबाज खेळ्या

* चेन्नईचा २२३ धावांचा डोंगर

* हैदराबादवर ७७ धावांनी दणदणीत विजय

* सामनावीर सुरेश रैना, चेंडू ५२, चौकार ११, षटकार ०३, ९९*

 

डावखुऱ्या फलंदाजांकडे एक अनोखा पंच उपजतच असतो असे म्हणतात. ते दोघेही डावखुरे, दोघांची शैली भिन्न असली तरी लाजवाब फटक्यांची पोतडी त्यांच्याकडे कायम भरलेली, अप्रतिम पदलालित्य आणि गोलंदाजीवर तुटून पडण्याची बेदरकार वृत्ती त्या दोघांकडेही होती. पण हे दोघे एकत्र फार कमी खेळताना पाहायला मिळाले आणि बुधवारी राजीव गांधी स्टेडियमवर जेव्हा एकत्र आले तेव्हा धावांची त्सुनामी घेऊनच. त्यातला एक म्हणजे धावांची ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा आणि लौकिकाला साजेशी फलंदाजी करत ‘ऑरेंज कॅप’ पटकावणारा माइक हसी आणि दुसरा म्हणजे गोलंदाजांवर बरसणारा सुरेश रैना. या दोघांनी दणकेबाज फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचत हैदराबाद सनरायजर्सच्या गोलंदाजीतली हवा काढून टाकली. हसीच्या ६७ आणि रैनाच्या नाबाद ९९ धावांच्या खेळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने २२३ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ फलंदाजांच्या मोबदल्यात १४६ धावाच करता आल्या आणि चेन्नईने सहजपणे ७७ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर २० गुणांसह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.

नाणेफेक जिंकत हैदराबादने चेन्नईला फलंदाजीचा पाचारण करत आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. मुरली विजयचा (२९) बळी त्यांना सहाव्या षटकात मिळाला खरा, पण त्यानंतर हसी आणि रैना यांच्या तडाख्यातून हैदराबादचा संघ सावरू शकला नाही. खणखणीत फटक्यांची बरसात करत या दोघांनी गोलंदाजांना हतबल करून सोडले. हसीने या वेळी स्पर्धेतले पाचवे अर्धशतक झळकावत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारत स्पर्धेत ५७४ धावा जमवत ‘ऑरेंज कॅप’ पुन्हा एकदा आपलीशी केली. हसीपेक्षा रैना थोडा उजवा नक्कीच वाटला. फक्त ५२ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ९९ धावांची खेळी साकारलेल्या रैनाला हंगामातील दुसरे शतक झळकावता आले नाही.

चेन्नईच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा श्वास १४६ धावांवरच थांबला. सलामीवीर पार्थिव पटलेचा (४४) अपवाद वगळता हैदराबादचा एकही फलंदाज चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे जास्त काळ तग धरू शकला नाही. तळाचा फलंदाज करन शर्माने (३९) थोडाफार प्रतिकार केला खरा, पण तो फलंदाजीला येण्यापूर्वीच हैदराबादच्या हातून सामना निसटला होता.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग : २० षटकांत ३ बाद २२३ (सुरेश रैना नाबाद ९९, माइक हसी ६७; थिसारा परेरा ३/३४) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४६ (पार्थिव पटेल ४४; मोहित शर्मा २/२८, सुरेश रैना १/४) सामनावीर : सुरेश रैना.

 

इऑन मॉर्गन, कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज

मुंबईविरूद्धचा सामना गमावल्याने आम्ही निराश आहोत. आम्हाला आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण यानंतरच्या सामन्यात नक्कीच सकारात्मक खेळ करून विजय मिळवू.