पुरुषांच्या गटामध्ये रायगड आणि ठाण्याच्या संघांची विजयाची नोंद

इस्लामपूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पध्रेत महिलांमध्ये मुंबई उपनगर आणि पुण्याने दमदार विजय नोंदवले, तर पुरुषांमध्ये रायगड आणि ठाण्याने विजयाची नोंद केली. साताऱ्याच्या सोनाली हेळवीने चढायांचे ३६ गुण मिळवत एक नवा विक्रम केला.

महिला विभागात कोमल देवकर आणि सायली नागवेकर यांच्या चढायांच्या बळावर मुंबई उपनगरने रायगडचा ३६-२१ असा पराभव केला. तेजस्वी पाटेकर व राणी उपहारने अप्रतिम पकडी केल्या. रायगडकडून मोनाली घोंगे व समीक्षा पाटील यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला. दुसऱ्या लढतीत साताऱ्याने पुण्याविरुद्ध २९-२६ अशी आघाडी मिळवली होती. सोनाली हेळवीच्या आक्रमक चढायांनी बलाढय़ पुणे संघाची चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरानंतर आम्रपली गलांडेने चांगला खेळ करत साताऱ्यावर अंकुश ठेवला.

सामन्याच्या अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना सोनालीच्या पकडीने सामना पुण्याकडे फिरला आणि त्यांनी ५९-५४ असा विजय मिळवला. पुण्याकडून ऋतिका हुमनेने चांगला खेळ केला.

पुरुषांमध्ये रायगडने बीचे आव्हान ४६-१८ असे मोडीत काढले. रायगडकडून चढाईत सुलतान डांगे व बिपिन थळे यांनी दिमाखदार खेळ केला. मयूर कदमने चांगल्या पकडी केल्या. याचप्रमाणे ठाण्याने चुरशीच्या लढतीत रत्नागिरीचा ३९-३३ असा पराभव केला. ठाण्याकडून प्रशांत जाधव व असलम इनामदार यांनी चतुरस्र खेळ केला.