जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने चीन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या राफेल नदालनेही दिमाखदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सने संघर्षपूर्ण विजयानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जोकोव्हिचने स्पेनच्या फर्नाडो व्हेर्डास्कोवर ७-५, २-६, ६-२ अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये तीन गुणांची कमाई करत जोकोव्हिचने आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत जोकोव्हिचने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र व्हेर्डास्कोने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत जोकोव्हिचला निष्प्रभ केले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावरच तिसरा सेट नावावर करत जोकोव्हिचने विजय मिळवला. पुढील फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला सॅम क्वेरीशी होणार आहे.
अमेरिकन ग्रँड स्लॅम जेतेपदासह राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाच्या दिशेने आगेकूच केली आहे. नदालने फिलीप कोहलश्रायबरचे आव्हान ६-४, ७-६ (७-३) असे संपुष्टात आणले. पुढील फेरीत त्याची लढत फॅबिओ फॉगनिनी याच्याशी होणार आहे. अन्य लढतीत जॉन आयस्नरने स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा ऑगट याला ६-२, ६-७, ६-४ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिलांमध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला रशियाच्या मारिया किरिलेन्कोविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी घाम गाळावा लागला. सेरेनाने ७-५, ७-५ अशा विजयासह या मोसमातील ७०व्या विजयाची नोंद केली आणि किरिलेन्कोविरुद्धची विजयी परंपरा १०-० अशी कायम राखली. बिगरमानांकित किरिलेन्कोने पहिल्या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सेरेनाने अनुभव पणाला लावत पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही किरिलेन्कोने ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र सेरेनाने लौकिकाला साजेसा खेळ करत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना चीनच्या लि ना हिने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणाऱ्या जर्मनीच्या सबिन लिसिकी हिच्यावर ७-५, ६-४ अशी मात केली. पेट्रा क्विटोव्हाने सारा इराणीवर ६-४, ६-७ (७-३), ६-३ असा विजय मिळवला. पोलंडच्या अ‍ॅग्निस्झेका रॅडवान्स्काने अमेरिकेच्या मॅडिसन कीचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला.

पेस-नेस्टॉर उपांत्य फेरीत
बीजिंग : लिएण्डर पेसने कॅनडाचा साथीदार डॅनियल नेस्टॉर याच्यासह संघर्षपूर्ण विजय मिळवत चीन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. वय वर्षे ४०पेक्षा जास्त असलेल्या या जोडीने स्पेनच्या डेव्हिड मरेरो आणि फर्नाडो वेर्डास्को यांचा ७-६ (१०-८), ६-३ असा पराभव केला. अव्वल मानांकित पेस-नेस्टॉर जोडीला उपांत्य फेरीत इटलीचा फॅबियो फॉगनिनी आणि आंद्रियास सेप्पी या जोडीचा सामना करावा लागेल.