सुप्रिया दाबके

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा ही क्ले कोर्टवरील म्हणजेच लाल मातीवरील रंगत असते. हिरवळीवर खेळण्यापेक्षा लाल मातीवर खऱ्या अर्थाने टेनिसपटूंचा कस लागतो. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिचसारख्या अव्वल टेनिसपटूंनाही कारकीर्दीत एकदाच ही लाल मातीवरील फ्रेंच खुली स्पर्धा जिंकता आली आहे. याउलट स्पेनच्या राफेल नदालने विक्रमी १२ वेळा ही स्पर्धा जिंकून तो लाल मातीवरील राजा असल्याचे सिद्ध केले आहे. यंदादेखील नदाल १३व्या फ्रेंच विजेतेपदासाठी सर्वाधिक प्रयत्न करेल, यात शंका नाही. महिलांमध्ये नेहमीप्रमाणे विजेतेपदाची दावेदार ठरवणे अवघड आहे.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आज म्हणजेच रविवारपासून (२७ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अर्थातच लाल मातीवरील टेनिस हंगामाला इटली आणि हॅम्बुर्ग येथील स्पर्धाद्वारे गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरुवात झाली आहे. मात्र नदालच्या लाल मातीवरील वर्चस्वाला कोण टक्कर देणार, याचीच उत्सुकता टेनिसजगताला आहे. नदालने नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून करोना संसर्गाच्या भीतीमुळे माघार घेतली होती. मात्र तो त्याच्या आवडत्या फ्रेंच स्पर्धेसाठी सज्ज आहे. यंदा १९ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालला कडवी टक्कर सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेचा विजेता डॉमिनिक थिम देईल, अशी चर्चा रंगते आहे. नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत थिमला २०१८ आणि २०१९च्या अंतिम फेरीत नमवले आहे. मात्र यंदा फ्रेंच स्पर्धेत थिम नवीन ग्रँडस्लॅम विजेता म्हणून प्रवेश करणार आहे.

करोनाकाळात नदालने इटली चषकाद्वारे आंतरराष्ट्रीय टेनिस खेळायला सुरुवात केली. मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच नदालला पराभवाचा धक्का बसला. याउलट अग्रमानांकित जोकोव्हिचने कारकीर्दीत नवव्यांदा इटली चषक स्पर्धा जिंकत फ्रेंच ग्रँडस्लॅमवर आपली मजबूत दावेदारी के ली. अमेरिकन स्पर्धेत १८ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचला अनवधानाने के लेल्या चुकीमुळे स्पर्धेबाहेर जाण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्या सर्वातून सावरल्याचे इटली स्पर्धा जिंकून जोकोव्हिचने सिद्ध केले. याउलट हलक्याशा दुखापतीमुळे थिमने इटली आणि हॅम्बुर्ग या लाल मातीवरील स्पर्धामध्ये सहभाग घेतला नव्हता. तो थेट फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळणार आहे. ‘‘इटली आणि हॅम्बुर्ग स्पर्धेत सहभागी झालो नसलो तरी फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. मधल्या काळात घरी राहून केलेली विश्रांती ताजेतवाने होण्यासाठी उपयोगी पडणार आहे,’’ असे थिम सांगतो.  फेडरर दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेत खेळणार नाही. या स्थितीत नदालसमोर मुख्य आव्हान जोकोव्हिच आणि थिम यांचेच आहे. थिमने अमेरिकन स्पर्धा जिंकून फेडरर, नदाल, जोकोव्हिच या त्रिकुटाच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अर्थातच फेडरर, नदाल हे त्या स्पर्धेत खेळले नाहीत आणि जोकोव्हिच चौथ्याच फेरीतून बाहेर झाला होता.

महिलांमध्ये यंदा अमेरिकन खुल्या विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाची उणीव भासणार आहे. ओसाकाने अमेरिकन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत टेनिस जगतात तिच्या चाहत्यांमध्ये भर घातली. फक्त खेळातच नाही तर सामाजिक संदेशही मुखपट्टय़ांद्वारे देऊन ओसाका समाजमाध्यमांवर चांगलीच गाजली. फ्लॉइड लॉईड या कृष्णवर्णीयाच्या हत्येचा निषेध म्हणून तिने वर्णद्वेषी अत्याचाराला बळी पडलेल्या एकूण सात जणांच्या मुखपट्टय़ा यंदा अमेरिकन स्पर्धेत घातल्या. त्याच वेळेला खेळाची गुणवत्ताही तिने दाखवली. मात्र ओसाकासमोर लाल मातीवर खेळणे हे तितकेच आव्हानात्मकही होते.

ओसाकाच्या अनुपस्थितीत बेलारुसच्या ३१ वर्षीय व्हिक्टोरिया अझारेंकाकडून मोठय़ा अपेक्षा के ल्या जात आहेत. अमेरिकन स्पर्धेत दमदार पुनरागमन करणाऱ्या अझारेंकाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. इटली चषक या लाल मातीवरील स्पर्धेतही खेळत अझारेंकाने ती फ्रेंच स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. अमेरिकन स्पर्धेत अझारेंकाने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला पराभूत करण्याची किमया साधली होती. सेरेना २४व्या विश्वविक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी आतुर आहे. २३ ग्रँडस्लॅमपैकी सेरेनाला फ्रेंच स्पर्धा तीन वेळाच जिंकता आली आहे. म्हणजेच मातीवर सेरेनाचे वर्चस्व नाही, हेच स्पष्ट झालेले आहे. मात्र ३९व्या वर्षांत लवकरच पदार्पण करणाऱ्या सेरेनाची ऐतिहासिक जेतेपदाची महत्त्वाकांक्षा तीव्र आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकल्यानंतर सेरेना एकही ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकू शकलेली नाही. ‘आई’ झाल्यामुळे सेरेनाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र पुनरागमनानंतर ग्रँडस्लॅम विजेतेपद हे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरते आहे. याव्यतिरिक्त अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकं दरीतच महिला एकेरीमध्ये खऱ्या अर्थाने चुरस असेल.

supriya.dabke@expressindia.com