News Flash

एकलव्य

एकलव्यानं गुरू द्रोणाचार्य यांना गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला नसता, तर तो अर्जुनाइतकाच मोठा धनुर्धर झाला असता.

| August 2, 2015 02:43 am

एकलव्यानं गुरू द्रोणाचार्य यांना गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला नसता, तर तो अर्जुनाइतकाच मोठा धनुर्धर झाला असता. तसा एकलव्यसुद्धा राजपुत्रच. पण तो भिल्ल समाजातला. अशा व्यक्तीला शिष्य बनवणे हे द्रोणाचार्याच्या तत्वात बसत नव्हते. या अशा अन्यायामुळे तो मोठा धनुर्धर नाही होऊ शकला; पण तरीही तो अजरामर झाला. ही कहाणी स्मरण्याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा क्लाइव्ह राइस. आधुनिक एकलव्यच तो. त्याच्या प्रगतीआड आला तो दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. या वर्णद्वेषी धोरणामुळे दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट सुमारे २० वष्रे बंदिवासात होतं. त्या गंजलेल्या काळानेच क्लाइव्हची ऐन बहरातली वष्रे हिरावून नेली. अन्यथा इम्रान खान, इयान बोथम, रिचर्ड हॅडली आणि कपिल देव या महान अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या पंक्तीत त्याचं नाव अभिमानानं घेता आलं असतं.

मध्यमगती गोलंदाजी, मधल्या फळीतील शैलीदार फलंदाजी आणि स्लिपमधील क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत. करारी बाणा आणि खाली झुकणारी मिशी त्याच्या राजबिंडय़ा व्यक्तिमत्त्वात भर घालत होत्या. त्यामुळे ‘ली व्हान क्लीफ’ या पाश्चिमात्य चित्रपटातही तो दिसला. आमिर खान ‘पीके’ चित्रपटात टेपरेकॉर्डर समोर धरत नग्नपणे अवतरला, त्याचप्रमाणे भल्यामोठय़ा बॅटला समोर धरत क्लाइव्हसुद्धा या चित्रपटात नग्नपणे दिसला होता. उमदा संघनायक म्हणून तो गाजला, परंतु आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपला ठसा उमटवण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही. त्यामुळेच आजारपणामुळे ६६व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला, तेव्हा क्रिकेटविश्व हळहळले.

क्लाइव्ह एडवर्ड बटलर राइसचा जन्म २३ जुलै १९४९ मध्ये जोहान्सबर्गला झाला. ट्रान्सव्हाल परगण्यातील सेंट जॉन्स महाविद्यालय आणि नताल विद्यापीठात त्याचं शिक्षण झालं. त्याचे आजोबा फिलिप ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून क्रिकेट खेळायचे, तर भाऊ रिचर्डलासुद्धा खेळाची विलक्षण गोडी होती. १९६९ पासून क्लाइव्हनं ट्रान्सव्हालकडून स्थानिक क्रिकेटला प्रारंभ केला. नव्या चेंडूंचा कौशल्यपूर्ण वापर, भेदक आऊटस्विंग आणि तितकीच जबाबदारीपूर्ण फलंदाजी यामुळे तो संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ झाला. १९७१-७२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी क्लाइव्हची निवड झाली. त्या वेळी तो २२ वर्षांचा होता; परंतु दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषाचे धोरण हा विषय ज्वलंत झाला आणि दुर्दैवाने ती मालिकाच रद्द झाली. त्याऐवजी शेष विश्व संघाविरुद्ध प्रदर्शनीय सामने खेळवण्यात आले; परंतु अनुभवाच्या कमतरतेमुळे नवख्या क्लाइव्हला संधी मिळाली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणासाठी क्लाइव्हला आणखी दोन दशके वाट पाहावी लागली. बंदिवास संपल्यानंतर १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिलावहिला दौरा केला. त्या वेळी ४२ वर्षीय क्लाइव्ह बंदिवासानंतरचा देशाचा पहिला कर्णधार झाला. त्या वेळी इडन गार्डन्सवर पहिला एकदिवसीय सामना खेळल्यावर ‘‘चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँगला जे वाटलं, तेच मला वाटत आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली होती. कोलकात्यामध्ये त्या वेळी क्लाइव्हनं मदर तेरेसा यांचीही भेट घेतली होती. तीन एकदिवसीय सामन्यांची ती मालिका दक्षिण आफ्रिकेनं गमावली. या मालिकेत क्लाइव्हच्या खात्यावर १३ धावा आणि २ बळी जमा होते. त्यामुळे ‘अतिज्येष्ठ खेळाडू’ म्हणून त्याच्यावर टीका झाली. परिणामी पुढच्याच वर्षी पुनरागमनानंतरच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी कॅरेबियन दौऱ्यावर जाणाऱ्या आफ्रिकन संघातून त्याला वगळण्यात आलं. त्यानंतर १९९२ च्या विश्वचषक संघासाठीसुद्धा त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे कसोटी खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलेल्या क्लाइव्हची क्रिकेट कारकीर्द फक्त तीन एकदिवसीय सामन्यांपुरती मर्यादित राहिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदिवासामुळे अल्पायुषी ठरलं, तरी दरम्यानच्या काळात स्थानिक क्रिकेटमध्ये क्लाइव्हनं आपली छाप पाडली. ४८२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४०.९५च्या सरासरीनं २६,३३१ धावा आणि २२.४९ च्या सरासरीनं ९३० बळी ही कामगिरीच त्याच्या खेळाचं मोठेपण सिद्ध करते. इंग्लिश काऊंटी अजिंक्यपद स्पध्रेत त्यानं हॅडली आणि डेरेक रँडल यांच्यासारख्या खेळाडूंसोबत नॉटिंगहॅमशायरचं प्रतिनिधित्व केलं आणि पराक्रम गाजवला. १९७९ ते १९८७ या कालखंडात त्यानं नॉटिंगहॅमशायरचं नेतृत्वही केले. ज्या संघाने १९२९ नंतर कोणतीही प्रभावी कामगिरी केली नव्हती, त्या संघाने १९८० मध्ये तिसरे स्थान, तर १९८१ मध्ये विजेतेपदाला गवसणी घालून कात टाकली. याच वर्षी ‘विस्डेन’नं त्याला वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवले. त्यानंतर काही वष्रे तो स्कॉटलंडमध्येही खेळला.
१९७० च्या दशकात कॅरी पॅकर क्रिकेट सर्कसनं अनेक क्रिकेटपटूंना मोहिनी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पडलेलं ते एक दु:स्वप्न होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) पॅकरची वर्ल्ड सीरिज बेकायदेशीर ठरवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच अस्तित्वात नसल्यामुळे अन्य दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंप्रमाणे क्लाइव्हसुद्धा यात सामील झाला. १९८० च्या दशकात काही बंडखोर क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत अनधिकृत कसोटी सामने खेळले होते. या वेळी बऱ्याचशा सामन्यांमध्ये क्लाइव्हनंच कर्णधारपद भूषवलं होतं.
निवृत्तीनंतर क्लाइव्हनं काही वष्रे दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट अकादमी सांभाळली, तसेच निवड समितीवरही कार्य केलं. १९९९ मध्ये नॉटिंगहॅमशायर संघाचा तो प्रशिक्षक झाला. माजी कर्णधार केव्हिन पीटरसनला दक्षिण आफ्रिका सोड आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट कारकीर्द सुरू कर, असा सल्ला क्लाइव्हनंच दिला होता. सप्टेंबर २०१० मध्ये ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीनं क्लाइव्ह प्रकाशझोतात आला होता. ‘‘पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांच्या मृत्यूला सट्टेबाजी करणारी एक संघटना जबाबदार आहे. या माफिया सट्टेबाजांना कुणीही रोखू शकत नाही. त्यांच्या मार्गात येणाऱ्या कुणाचीही ते तमा बाळगत नाही,’’ असं भाष्य त्यानं केलं होतं. क्रिकेटमधील दुष्कर्माविषयीची त्याला चीड होती. बंदिवासामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाकोळलेल्या, पण तरीही क्रिकेटचा वसा अखंड आयुष्यभर जपणाऱ्या आधुनिक एकलव्य क्लाइव्ह राइसला सलाम!
– प्रशांत केणी
prashant.keni@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:43 am

Web Title: clive rice the best cricketer
Next Stories
1 फेडरर-नदाल आमनेसामने
2 ‘बळी’राजे
3 भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व उन्मुक्त चंदकडे
Just Now!
X