Asian Games 2018 : आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी भारतीय नेमबाज राही सरनौबत हिने भारतासाठी पदकाची कमाई केली. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले अव्वल स्थान कायम राखले होते. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले होते. पण अखेर या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

राहीला मिळालेल्या या यशात सर्व स्तरातून कौतुक होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे आणि या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच, या स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विट नुसार, सुवर्णपदक विजेत्यांना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना २५ आणि कांस्य पदक विजेत्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, राहीने आज भारताला स्पर्धेतील चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले.अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले. त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केले.