25 March 2019

News Flash

अँटी करप्शन युनिटकडून मोहम्मद शमीच्या चौकशीची शक्यता

देशाला धोका देण्यापूर्वी मी मरणे पसंत करेन असे, शमीने म्हटले

सध्या संकटात सापडलेला भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटकडून लवकरच मोहम्मद शमीची चौकशी सुरू केली जाऊ शकते. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचा थेट आरोप केला नव्हता. पण विदेशी व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर बीसीसीआयची अॅडमिनिस्ट्रेटर कमिटी सीओएने अँटी करप्शन युनिटला हसीन जहाँच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/973809234751221762

हसीनने आरोप केला होता की, शमीने दुबईत पाकिस्तानच्या अलिस्बा नावाच्या मुलीकडून पैसे घेतले होते. यामध्ये इंग्लंडमध्ये राहणारा उद्योगपती मोहम्मदभाईचाही समावेश होता. हसीनने स्वत: यावेळी उपस्थित असल्याचा दावा केला होता. हसीनने शमीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत शमी जर स्वत:च्या पत्नीला धोका देऊ शकतो तर देशाला धोका का देऊ शकत नाही, अशी शंका उपस्थित केली होती.

सीओएने अँटी करप्शन युनिटला येत्या सात दिवसांत अहवाल देण्याची सूचना केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मदभाई आणि अलिस्बा कोण आहेत? शमीने त्यांच्याकडून खरेच पैसे घेतले आहेत का? पैसे घेतले असतील तर त्यांचा हेतू काय होता, याचा अँटी करप्शन युनिट तपास करेल. बीसीसीआयनेही या तीन मुद्द्यांचाच तपास केला जाईल हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंगच्या आरोपांचा इन्कार केला आहे. देशाला धोका देण्यापूर्वी मी मरणे पसंत करेन असे, शमीने म्हटले आहे. बीसीसीआयने शमीला आपल्या वार्षिक करारातही स्थान दिलेले नाही. कोलकाता पोलिसांनीही शमीविरोधात घरगुती हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हसीननेही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. हसीनने पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे.

First Published on March 14, 2018 12:34 pm

Web Title: coa writes to anti corruption unit to investigate fixing charges against mohammad shami