टोक्यो : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत परदेशी प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास मोबाइलवर आरोग्यासंबंधी ‘अ‍ॅप’ वापरणे सक्तीचे होण्याची शक्यता आहे.

परदेशी प्रेक्षकांना पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश द्यायचा की नाही याबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. मात्र परदेशी प्रेक्षकांना प्रवेश दिला तर त्यांच्या आरोग्याचा दैनंदिन आढावा मिळावा यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये संबंधित ‘अ‍ॅप’ असणे आवश्यक असू शकते. त्याबाबतचे वृत्त जपानमध्ये पसरल्यावर तेथील नागरिकांनी त्याचे समाजमाध्यमावरून स्वागत केले आहे. परदेशी प्रेक्षक जपानमध्ये ऑलिम्पिकसाठी मोठय़ा प्रमाणात आले तर करोना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती तेथील नागरिकांना वाटत आहे.

जपानने अन्य देशांच्या तुलनेत करोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मात्र टोक्योमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा करोना रुग्ण आढळून आले. अजून परदेशी प्रेक्षकांच्या आरोग्यासंबंधीच्या ‘अ‍ॅप’ सक्तीबाबत जाहीर प्रतिक्रिया ऑलिम्पिकच्या संयोजन समितीकडून आली नाही. मात्र पुढील वषी होणारा ऑलिम्पिक हा नेहमीप्रमाणे सोहळ्यासारखा नसेल, असे संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुशिरो मुटो यांनी सांगितले. ‘‘टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेहमीप्रमाणे मोठा जल्लोष नसेल. खेळाडूंच्या स्पर्धा झाल्यावर लगेचच त्यांनी मायदेशी परतणे अपेक्षित आहे. खेळाडूंचा क्रीडा नगरीतील राहण्याचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूंनी मायदेशात सुरक्षित परतणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे मुटो यांनी स्पष्ट केले.