करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सध्या समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती पुढे येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद केल्या आहेत. खडतर प्रसंगात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस हे दक्ष राहत आपलं कर्तव्य बजावत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान आणि युसूफ पठाण यांनीही सध्याच्या कठीण प्रसंगात आपलं सामाजिक भान राखलं आहे. इरफान पठाणने आपल्या परिसरातील गरजू लोकांना मोफत मास्क वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर इरफानने आपण करत असलेल्या मदतीबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. इरफान आणि युसूफ हे आपल्या वडिलांच्या नावे एक संस्था चालवतात. या संस्थेमार्फत हे मास्क स्थानिक आरोग्य विभागाकडे पोहचवले जातील असं इरफानने सांगितलं आहे.

यावेळील इरफानने ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा कठीण प्रसंगात पुढे येत आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचं आवाहन केलं आहे. इरफान आणि युसूफ पठाण हे बडोद्याचे रहिवासी आहे. गुजरातमध्येही करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. मे महिन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचसोबत यंदा आशिया चषकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.