नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळे पुढील महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतून भारताने शुक्रवारी माघार घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (आयएसएसएफ) मान्यतेने निकोशिया येथे ४ ते १३ मार्च या कालावधीत शॉटगन विश्वचषक स्पर्धा होणार होती. सरकारकडून सूचना आल्यानंतर भारतीय संघाने विश्वचषकातून माघारीचा निर्णय घेतला, असे भारतीय रायफल नेमबाजी संघटनेकडून सांगण्यात आले.
करोनाचा धोका हे स्पर्धेत सहभागी न होण्याचे एकमेव कारण आहे. सद्य:स्थितीत हाच निर्णय योग्य आहे. खेळाडूंना आणि मार्गदर्शकांनाही जोखमीचे ठरू शकले असते, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
सायप्रस येथील विश्वचषक स्पर्धा आणि नवी दिल्ली येथे १६ मार्चपासून सुरू होणारा ‘आयएसएसएफ’ विश्वचषक एकापाठोपाठ एक आहे, याकडेही रणिंदर सिंग यांनी लक्ष वेधले. ‘‘सायप्रसला जर भारताचा संघ गेला असता तर मायदेशात परतायला १२ मार्च तारीख उजाडली असती. अर्थातच नवी दिल्ली येथील स्पर्धा १६ मार्चपासून आहे. यास्थितीत जर एखाद्या खेळाडूला संसर्गाचा फटका बसला तर त्याला सायप्रस येथून मायदेशी परतण्यास अडचणी येऊ शकतात. या ठिकाणी खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न आहे. संसर्गाचा फटका खेळाडूंना बसू नये, हीच अपेक्षा आहे,’’ असे रणिंदर सिंग यांनी सांगितले.
सायप्रस येथे अद्याप करोनाचा संसर्ग पोहोचलेला नाही. मात्र काही संशयित रुग्णांना स्वतंत्रपणे ठेवण्यात आले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. सायप्रसला जर भारताचा नेमबाजी संघ रवाना झाला असता तर त्या संघात मानवजित सिंग संधू, श्रेयसी सिंग, लक्ष्य शेरॉन, अंगड विर सिंग बाजवा आणि मायराज अहमद खान यांचा समावेश होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून २६ फेब्रुवारीला प्रवासासंबंधीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये काही देशांना भेटी देण्यासंदर्भात संपूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. ४ मार्चला सायप्रस येथे होणाऱ्या विश्वचषकातून भारताने माघार घेतली आहे. कारण त्याठिकाणी करोना संसर्ग झालेल्या काही देशांतील खेळाडू उपस्थित असतील याची आम्हाला खात्री आहे.
-रणिंदर सिंग, राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 2:09 am