करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका संपूर्ण क्रीडा जगतालाही बसला आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी गेले ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे. मधल्या काळात आयसीसीसह सर्वच क्रिकेट बोर्डांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयसमोरही आर्थिक संकट आ वासून उभं आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही या परिस्थितीचा फटका बसलेला असून, पाकिस्तान संघासाठी नवीन स्पॉन्सर मिळत नसल्यामुळे बोर्डासमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे.

Pepsi कंपनीसोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा करार संपला आहे. संघाच्या नवीन स्पॉन्सरसाठी पाक क्रिकेट बोर्डाने निवीदा मागवल्या होत्या, धक्कादायक गोष्ट म्हणजे कोणत्याही नवीन कंपनीने पाक संघाला स्पॉन्सरशीप देण्यामध्ये रस दाखवलेला नाहीये. Pepsi कंपनीने पुन्हा एकदा स्पॉन्सरशीप देण्याची तयारी दाखवली असली, तरीही याआधीच्या कराराच्या तुलनेत पेप्सी कंपनी ३५-४० टक्के रक्कम कमी खर्च करणार असल्याचं सांगितलं. अनेक कंपन्यांना करोना लॉकडाउनचा फटका बसल्यामुळे, स्पॉन्सरशीप डिलसाठीही कंपनी हातचं राखून पैसा देत असल्याचं पीसीबीमधील सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे नवीन करारासाठी पाक क्रिकेट बोर्ड आणि Pepsi कंपनीत सध्या वाटाघाटी सुरु असल्याचं कळतंय.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, पाक क्रिकेट बोर्ड देशातील स्थानिक क्रिकेट संघांसाठीही स्पॉन्सरशीप शोधू शकलेलं नाहीये. कोणत्याही कंपनीने स्थानिक क्रिकेट संघावर पैसा लावण्यात स्वारस्य दाखवलेलं नसल्यामुळे, आगामी काळात स्थानिक संघांना स्वतःच्या खर्चावर सामने खेळावे लागू शकतात. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, पाक क्रिकेट संघाच्या सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या Ten Sports वाहिनीसोबतही पाक क्रिकेट बोर्डाचा करार संपला असून कोणतीही नवीन कंपनी हा करार करण्यास उत्सुक नसल्याचं कळतंय. पाकिस्तानचा इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी या परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा पाक क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आहे.