आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या अॅशेल मालिकेला ऐतिहासिक महत्व आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघातील खेळाडू आपल्या कारकिर्दीत एकदातरी अॅशेस मालिका खेळता यावी यासाठी प्रयत्न करत असतात. २०१७-१८ हंगामाच्या अॅशेस मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंसाठी एका खास प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मैदानातला ‘स्टॅमिना’ आणि ‘रनिंग बिटवीन द विकेट’ सुधारण्यासाठी युसेन बोल्ट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. रविवारपासून मेलबर्नमध्ये युसेन बोल्टने काही ठराविक खेळाडूंसाठी अॅशेस मालिकेसाठी पहिलं प्रशिक्षण सत्र घेतलं.

“तुम्ही धाव घेताना खेळपट्टीवर किती वेगाने धावता, याला क्रिकेटमध्ये महत्व आहे. गेल्या काही दिवसांत क्रिकेटमधलं तंत्रज्ञान, खेळाची पद्धत झपाट्याने बदलते आहे. मात्र मी जेव्हा कधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फलंदाजीत धाव घेताना पाहतो, तेव्हा ते मला अत्यंत हळू धावतात असं वाटलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, मात्र धाव घेताना त्यांनी योग्य वेग सांभाळला तर त्याचा त्यांना फायदाच होईल.” ‘हेराल्ड सन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युसेन बोल्टने ही माहिती दिली.

आपल्या पहिल्या ट्रेनिंग सेशनमध्ये बोल्टने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना काही टिप्स दिल्या. ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू ज्या पद्धतीने सराव करतात, ती पद्धत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बोल्टने समजावून सांगितली. आपल्या या पद्धतीचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मैदानात नक्की फायदा होईल, असा आत्मविश्वास युसेन बोल्टने व्यक्त केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने युसने बोल्ट आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या ट्रेनिंग सेशनचा एक खास व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील यंदाच्या हंगामातील अॅशेस मालिकेला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे युसेन बोल्टकडून मिळालेल्या टिप्सचा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना किती फायदा होतो हे पाहावं लागणार आहे.