01 October 2020

News Flash

“चित्रपटाप्रमाणे प्रत्येक क्रिकेट सामना आधीच ठरलेला असतो”, बुकी संजीव चावलाचे धक्कादायक खुलासे

चित्रपटाप्रमाणे प्रत्येक क्रिकेट सामन्यात काय होणार हे आधीच ठरलेलं असतं, बुकीचे दिल्ली पोलिसांकडे खुलासे

कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही. प्रत्येक क्रिकेट सामन्याचं भवितव्य आधीच ठरलेलं असतं असा दावा बुकी संजीव चावलाने केला आहे. २००० हॅन्सी क्रोन्जे मॅच फिक्सिंग प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या संजीव चावला याने दिल्ली पोलिसांना जबाब दिला असून यामध्ये त्याने हा खुलासा केला आहे. क्रिकेटमध्ये अंडरवर्ल्ड माफिया तसंच एक खूप मोठं जाळं असल्याचेही संकेत त्याने दिले आहेत. संजीव चावला याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट सामना हा चित्रपटाप्रमाणे असतो, जो आधीच कोणीतरी दिग्दर्शित केलेला असतो.

संजीव चावलाचा नवी दिल्लीत जन्म झाला असून लंडनमधून तो सगळा कारभार करत होता. आपण गेल्या अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग करत असल्याचं मान्य करताना त्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मॅच फिक्सिंगमध्ये अनेक मोठे लोक तसंच अंडलवर्ल्ड माफियाचा सहभाग असून ते धोकादायक आहेत. जर आपण काही बोललो तर आपली हत्या करण्यात येईल अशी त्याला भीती आहे.

विशेष पोलीस आयुक्त (क्राइम) परवीर राजन यांनी यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. प्रकरणाचा तपास सुरु असल्याने आपण याबद्दल अधिक माहिती शेअर करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दिल्ली पोलीस क्राइम ब्रांचने आरोपपत्रात संजीव चावला सहकार्य करत नसल्याने गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचं सिद्ध होत असल्याचा उल्लेख केला आहे. जामीन मिळाल्याने संजीव चावला सध्या जेलबाहेर आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. संजीव चावला याच्यासोबत त्याचे सहकारी कृष्ण कुमार, राजेश आणि सुनीलदेखील जामीनावर आहेत.

संजीव चावला आणि इतरांनी दक्षिण आफ्रिकेच्या २००० भारत दौऱ्यात मॅच फिक्सिंग केली होती. संजीव चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील संभाषणातून पैसे आणि संघामधील माहिती दिलं जात असल्याचं उघड झालं होतं.

संजीव चावलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १९९३ मध्ये कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी तो लंडनला गेला. ऑक्सफोर्ट स्ट्रीट येथे त्याची दुकानं होती. कुमार, राजेश आणि सुनील आपले जुने मित्र असून तेदेखील मॅच फिक्सिंग करत होते. २००० मध्ये त्याला इंग्लंडचं नागरिकत्व मिळालं. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यार्पण करत संजीव चावलाला भारतात आणण्यात आलं.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे याने आपण मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. २००२ मध्ये विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. यानंतर २०१७ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरूद्ध कारवाई थांबविण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 9:24 am

Web Title: cricket matches fixed like movie directed by someone else says bookie sanjeev chawla sgy 87
Next Stories
1 एकाच मैदानावर सामने खेळवण्याचा पर्याय!
2 .. म्हणून रोहित ‘आयपीएल’मधील सर्वोत्तम कर्णधार -लक्ष्मण
3 कसोटी संघात पुनरागमन करण्याचे ध्येय -भुवनेश्वर
Just Now!
X