करोना विषाणू संसर्गातून बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग मोठय़ा प्रमाणात आयोजित करणे योग्य ठरणार नाही, असे भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे.

‘‘करोनामधून बाहेर पडल्यानंतर लीग क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोठय़ा प्रमाणात होईल असे मला वाटत नाही. देशांच्या सीमा बंद असल्याकारणाने क्रिकेट इतक्यात सुरू होण्याची शक्यता नाही. क्रिकेट लवकर सुरू होईल, असे अनेकांना वाटत असले तरी सामाजिक अंतराचे भान बाळगता इतक्यात क्रिकेट अशक्य आहे. त्यातच अजून करोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडायला किती काळ लागेल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही,’’ असे अश्विनने सांगितले.

कसोटी क्रिकेटमध्ये यापुढेही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असे अश्विनने सांगितले. ‘‘शरीराने साथ दिली तर कसोटी क्रिकेटमध्येही पूर्वीसारखीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही एक व्यावसायिक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो,’’ असे अश्विनने म्हटले. कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच हवे असे मतही त्याने व्यक्त केले. ‘‘मला चार दिवसांचे कसोटी क्रिकेट पटत नाही. मी एक फिरकीपटू आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण दिवस गोलंदाजी करण्याचे आव्हान असते. जर चार दिवसांचीच कसोटी खेळवली तर या खेळातील मजा संपू शकते,’’ असे अश्विन याने म्हटले.