गौरव जोशी

क्रिकेट ज्या ठिकाणी खेळले जाते, त्या ठिकाणाला भारतात मैदान तर ऑस्ट्रेलियामध्ये ग्राऊंड असे म्हटले जाते. परंतु इंग्लंडमध्ये लहान-लहान शहरात किंवा खेडेगावात क्रिकेट जेथे खेळले जाते त्याला ‘व्हिलेज ग्रीन’ असे म्हणतात. या गावात होणारे क्रिकेटचे सामने एका गावाविरुद्ध दुसरे गाव असे होतात. बूस्टरवरून साधारण २० मैलावर अगदी डोंगराच्या पायथ्याशी कॉलवॉल क्रिकेट क्लब आहे. या क्लबची खासियत म्हणजे १९२६ साली इंग्लंडमधून महिला क्रिकेट संघटनेची स्थापना येथून झाली आहे. ही संघटना सुरू झाल्यानंतर क्रिकेट येथे वाढायला लागले.

या खेडेगावातील सामन्यांना संपूर्ण खेडेगावातील लोक मदत करतात. अगदी क्युरेटर, गुणलेखन करणे किंवा क्लब हाऊसमध्ये जर काही मदत लागली तर ही सर्व कामे येथील लोक स्वतहून करतात. खेडेगावातील लोकांना क्रिकेट या खेळाबद्दल प्रचंड आपुलकी आहे. आपल्या गावातील संघाला कशा प्रकारे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे किंवा जिंकवायचे, यातच त्यांना अभिमान वाटतो. या कामाबद्दल त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. ते एक स्वयंसेवक म्हणून क्लबमध्ये काम करतात. येथील एक क्युरेटर हा बाजूच्या गावातील बँकेमध्ये कार्यरत आहे. गावातील एक वयस्क व्यक्ती आम्हाला म्हणाली, ‘‘मला माझ्या गावाबद्दल अभिमान आहे. या मैदानात खेळणारी मुले मोठे क्रिकेटपटू नाही झाले तरी चालतील, परंतु त्यांनी किमान आजूबाजूच्या गावांसोबत होणाऱ्या सामन्यांमध्ये जिंकावे इतकीच आमची इच्छा असते.’’

या ठिकाणी जेव्हा उन्हाळा सुरू होतो, तेव्हा रात्री १० वाजेपर्यंत लख्ख प्रकाश असतो. त्यामुळे या गावातील ट्वेन्टी-२०चे सामने संध्याकाळी साडेसहा वाजता चालू होतात आणि साधारण नऊ-साडेनऊपर्यंत संपतात. जेव्हा हे सामने सुरू असतात, तेव्हा आजूबाजूच्या गावातील अनेक लोक येथे हे सामने बघण्यासाठी येतात. परंतु कितीही लोक आले तरी त्यांच्या खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था येथील लोक करतात. यामधून जे पैसे जमा होतात, ते पैसे या क्लबसाठी नव्या सोयी-सुविधांसाठी वापरले जातात. गावातील लोकांना जेव्हा मोकळा वेळ भेटतो, तेव्हा क्लबमध्ये येऊन क्रिकेटची परंपरा इतर गावांमध्ये वाढवण्यासाठी लागणारी मदत करत असतात.

अशाच लहान गावांमधील व्हिलेज ग्रीनमध्ये क्रिकेट खेळून जो रूट, जॉस बटलर, बेन स्टोक्स यासारखे नावाजलेले खेळाडू पुढे आले आहेत. जसे भारतातील मोठमोठय़ा शहरांतील लोकवस्ती वाढल्यामुळे जागा कमी होत चालली आहे, तशीच परिस्थिती इंग्लंडची होत चालली आहे. क्रिकेटपटूदेखील बाहेरील गावांतून येथे येऊ लागले आहेत. टीव्हीवर येथे जास्त क्रिकेट पाहिले जात नाही, कारण येथे मोफत वाहिन्यांचे पर्याय उपलब्ध नाहीत. शुल्क असलेल्या टेलिव्हिजन वाहिन्यांवरच क्रिकेट बघायला मिळते. शहरातील लोक मॉल किंवा इतर ठिकाणी फिरायला जायला लागले आहेत. त्यामुळे शहरातील लोकांमधली क्रिकेटची आवड थोडी कमी झालेली आम्हाला दिसली. या क्लबचे प्रशिक्षक आम्हाला म्हणाले, ‘‘व्हिलेजमध्ये क्रिकेट अजूनही खूप मोठय़ा संख्येने लोक खेळतात. लोकांना त्याची आवड आहे. उन्हाळ्यात सोमवार-मंगळवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्याचा मुले आनंद लुटतात.’’

कॉलवॉल क्रिकेट क्लब येथे चालू असलेला सामना आम्ही बुधवारी बघितला. खेळाडूंचे नातेवाईक, आई-वडील सामना पाहण्यासाठी येतात. एक डाव संपल्यानंतर मधल्या विश्रांतीच्या वेळी खेळाडू त्यांच्यासोबत छान गप्पा मारतात. ही १० मिनिटे संपल्यावर पुन्हा सामना खेळायला सुरुवात करतात. खेळपट्टीपासून ते मैदानाच्या लांब असलेल्या भागापर्यंत उतार असणे गरजेचे आहे. कारण पाऊस पडला तर खेळपट्टीवर पाणी राहणार नाही अशा मैदानातील प्रत्येक सोयी-सुविधांचा बारकाईने विचार येथे केला जातो. आमच्याकडे डिजिटल गुणफलकदेखील असल्याचे तेथील क्युरेटरने सांगितले. सामन्यानंतर दोन्ही संघ एकत्र भोजन करतात. भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांतील लोक क्रिकेटकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातून बघतात. येथील शहरांमध्ये किंवा गावांमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडावे, म्हणून गांभीर्याने पाहिले जाते. परंतु इंग्लंडच्या या गावात क्रिकेट हा खेळ एक आवड म्हणून खेळला जातो.