भारतीय संघातील खेळाडूंना सध्या दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे तो पुढचे २-३ सामने खेळणार नाहीये. त्यातचं गुरुवारच्या सरावसत्रात बुमराहच्या यॉर्कर चेंडूचा सराव करताना विजय शंकरला दुखापत झाली. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, मात्र त्याच्या नसण्याचा संघावर कोणताही परिणाम होणार नाही असं मत जसप्रीत बुमराहमने व्यक्त केलं आहे.

“भुवनेश्वर कुमार संघात नसल्याचा फारकाही परिणाम जाणवणार नाही. आम्ही नेहमी आमच्या जमेच्या बाजू लक्षात घेत असतो. ज्यावेळी भुवी सोबत असतो त्यावेळी रणनिती वेगळी आखली जाते, शमी सोबत असताना वेगळ्या रणनितीचा विचार होतो…कधीकधी आम्ही तिघंही एकाच संघात खेळलो आहोत. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींवर आम्हाला लक्ष केंद्रीत करण्याची गरज नाहीये.” बुमराह पत्रकार परिषदेत बोलत होता.

भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध लढणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : शिखर धवनचं संघात नसणं आमच्यासाठी दुर्दैवी – जसप्रीत बुमराह