विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने आपला पराभव मान्य केला आहे.

पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या पराभवाचं कारण विचारलं असताना विराट म्हणाला, “२४० धावांचा पाठलाग करु असा विश्वास आम्हाला होता. मात्र पहिल्या ४५ मिनीटांमध्ये आम्ही प्रचंड खराब खेळ केला. हीच ४५ मिनीटं आम्हाला पुढे महागात पडली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे आम्ही बॅकफूटला ढकलले गेलो. इथेच आम्ही सामना आमच्या हातातून निसटला होता.”

अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी शतकी भागीदारी रचत भारताला विजयाच्या समीप आणून सोडलं खरं, मात्र मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर तळातल्या फलंदाजांना विजयासाठी उरलेलं आव्हान पूर्ण करणं शक्य झालं नाही आणि न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : उपांत्य सामन्यातलं दुष्टचक्र विराटची पाठ सोडेना, ऋषभ पंत मात्र ठरला लकी