भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही. संघातून सतत आत-बाहेर होण्यामागे त्या दुखापतीही कारणीभूत ठरल्या. त्यामुळे फेब्रुवारी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करूनदेखील त्याने केवळ १२ वन डे आणि तीन टी २० सामन्यांमध्येच टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. पण सध्या मनोज तिवारीची पत्नी अधिक चर्चेत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे.

मनोज तिवारीची पत्नी सुस्मिता रॉय ही सोमवारी ‘आयपीएल फ्रीक’ नावाच्या एका क्रिकेट फॅन पेजच्या पोस्टवरून भडकली. त्या पोस्टमध्ये भारताच्या ११ ‘फ्लॉप’ क्रिकेटपटूंची यादी होती. त्यात तिचा पती मनोज तिवारी याचाही समावेश करण्यात आला होता. ते पाहून सुस्मिता चांगलीच संतापली आणि तिने ते पेज प्रोफाइल तयार करणार्‍या व्यक्तीला चांगलंच सुनावलं. तसेच, जरा आकडेवारी बघ असेही खडसावलं.

२०२० मध्ये मनोज तिवारीने रणजी करंडक स्पर्धेत बंगालसाठी खेळताना आपले पहिलेवहिले त्रिशतक ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मनोज तिवारीने १९६ डावांत २७ शतके आणि ३७ अर्धशतकांसह ५० पेक्षा अधिकच्या सरासरीने ८ हजार ९६५ धावा केल्या आहेत. तर वन डे क्रिकेटमध्ये त्याने १५३ डावांत त्याने सहा शतके आणि ४० अर्धशतकांसह ५,४६६ धावा केल्या आहेत.

मनोज तिवारी

कोलकाता नाईट रायडर्स संघाने IPL 2012 चे विजेतेपद पटकावले होते. त्या विजेत्या संघात त्याचा समावेश होता. चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या अंतिम सामन्यात तीन चेंडूत ९ धावांचे योगदान देत त्याने संघाला दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला होता. मनोज तिवारी IPL मध्ये एका दशकापासून खेळतो आहे. त्याने ९८ सामन्यांत २८ च्या सरासरीने ७ अर्धशतकांसह १९९५ धावा केल्या आहेत.