पाकिस्तानी संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संघाची घोषणा केली. जुलै महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अझर अलीकडे पाकिस्तानच्या कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलेलं असून बाबर आझम टी-२० मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अखेर हिरवा कंदील मिळाला, पण या दौऱ्यावर सोबत पत्नी, गर्लफ्रेंड किंवा कुटुंबाला घेऊन जाण्याची परवानगी पाकिस्तान संघाला नाकारण्यात आली आहे.

“इंग्लंड दौऱ्यावर जाताना खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाता येणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये जाऊन पूर्ण दौऱ्यात प्रत्येक खेळाडूला विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दौरा संपेपर्यंत खेळाडूंना आपल्या कुटुंबाला भेटता येणार नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाण्यात काहीच अर्थ उरत नाही, असे त्यांना समजावून देण्यात आले आहे”, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका सूत्राकडून माहिती देण्यात आली.

दरम्यान, इम्रान खान आणि पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्यात सोमवारी एक बैठक झाल्यानंतर पंतप्रधानांनी दौऱ्याला मान्यता दिली. या बैठकीत या दौऱ्याबाबतची सगळी माहिती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी क्रिकेट मालिकेला हिरवा कंदील दाखवला. “पंतप्रधान इम्रान खान यांनी मणी यांना सांगितलं की पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० क्रिकेट मालिकेसाठी जाणं महत्त्वाचं आहे, कारण आता साऱ्यांनाच पुन्हा क्रिकेटचा थरार पाहायचा आहे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनेक इतर क्रीडा प्रकार सुरू झाले आहेत”, असे पाक क्रिकेट बोर्डाने सांगितले.