मालिका पराभवांचा ससेमिरा सध्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या मागे लागल्याचे दिसत आहे. त्याच्यावर चारीही बाजूने टीका होत असताना मात्र त्याचे पहिले प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी ‘धोनीवर टीका करणे म्हणजे सचिनच्या पात्रतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासारखे’ असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
४९ वर्षीय भट्टाचार्य हे यांच्यामुळे धोनी क्रिकेट खेळायला लागला. सुरुवातीला धोनी फुटबॉल खेळायचा तेव्हा त्याला हे सोडून क्रिकेट खेळण्याचा सल्ला भट्टाचार्य यांनी दिला होता. त्यानंतर गोलरक्षक धोनी यष्टिरक्षक म्हणून १९९५ साली सर्वाच्या समोर आला.
‘‘टीकांचे नेहमीच स्वागत करायला हवे, पण ती टीका सुदृढ असायला हवी. कारण प्रत्येक दिवस हा काही रविवार नसतो, प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगलाच असेल, असे सांगता येत नाही. ट्वेन्टी-२० चे विश्वविजेतेपद, २०११ चा विश्वचषक आणि कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक त्याने देशाला मिळवून दिला. त्याच्या कप्तानीवर टीका करणे म्हणजे सचिन तेंडुलकरच्या धावा काढण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासारखे आहे’’, असे भट्टाचार्य यांनी सांगितले.
जास्त दडपणामुळे धोनी एका प्रकारात कर्णधारपद करत राहील, असे सूतोवाच भट्टाचार्य यांनी केले. ‘‘२०१५ चा विश्वचषक पाहाता धोनी क्रिकेटच्या एका प्रकाराचे कर्णधारपद कायम ठेवेल. त्याच्याशी याबाबतीत काहीच बोलणे झाले नाही, पण २०१४ पर्यंत धोनी क्रिकेटच्या एका प्रकाराचे कर्णधापद सोडेल,’’ असे मला वाटत असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.