नवीन कुमारच्या झंझावाती चढायांमुळे दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन्सचा ३७-२९ असा पराभव करत ६९ गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले.

नवीन कुमारने (१२ गुण) सलग १४व्या सामन्यात १०पेक्षा अधिक गुण मिळवण्याची करामत केली. त्याला रवींद्र पहल आणि अनिक कुमार यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत पकडींमध्ये चांगली साथ दिली. तेलुगूच्या सिद्धार्थ देसाईने १२ गुण मिळवले, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

दुसऱ्या सामन्यात, यूपी योद्धाने जयपूर पिंक पँथर्सला ३८-३२ असे हरवले. श्रीकांत जाधव (९ गुण), रिशांक देवाडिगा (८ गुण) यांनी यूपी योद्धाच्या विजयात योगदान दिले.