भक्कम आघाडी घेण्याच्या उद्देशाने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची कुक-पीटरसन जोडी मैदानात उतरली. मात्र थोडय़ाच वेळात हे दोघेही तंबूत परतले. पण यानंतर इयान बेलने संयमी खेळी करत इंग्लंडला मोठी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ६ बाद ३२६ धावा झाल्या आहेत. इंग्लंड संघ २६१ धावांनी आघाडीवर असून, बेल ९५ तर स्टुअर्ट ब्रॉड ४७ धावांवर खेळत आहे.

पीटरसनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारत झटपट अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करणारा पीटरसन धोकादायक ठरणार, असे वाटत होते. मात्र जेम्स पॅटिन्सनच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा पीटरसनचा प्रयत्न फसला आणि तो त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. पीटरसनने १२ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. पीटरसन-कुक जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी रचली. पीटरसन बाद झाल्यानंतर कुकने आपले अर्धशतक पूर्ण केले. कुक स्थिरावलाय असे वाटत असतानाच अ‍ॅश्टन अगरने त्याला क्लार्ककडे झेल देण्यास भाग पाडले. ११व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढणाऱ्या अगरचा कसोटी कारकीर्दीतील हा पहिलाच बळी ठरल. कुकने ६ चौकारांसह ५० धावांची खेळी केली.
मैदानावर स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्यानंतर इयान बेलने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने जॉनी बेअरस्टोच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. मात्र अगरने बेअरस्टोला बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकले. मॅट प्रॉयरने बेलला चांगली साथ दिली. त्यानंतर पीटर सिडलने प्रॉयरला ईडी कोवानकरवी बाद केले. त्याने ३१ धावा केल्या. बेल आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद १०८ धावांची भागीदारी केली. बेलने पाच तासांहून अधिक किल्ला लढवत १२ चौकारांसह नाबाद ९५ धावांची खेळी केली.